धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) ॲड. गोरक्ष लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव जिल्ह्यातील विविध नगर परिषदांमधील अनुसूचित जाती घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या अनुषंगाने धाराशिव येथे कार्यालयात नगर परिषद परंडा, भूम, वाशी, कळंब व धाराशिव तसेच सहायक आयुक्त,समाज कल्याण  व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत अनुसूचित जाती घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा मागील पाच वर्षांचा आढावा,आर्थिक दुर्बल घटकांवर करण्यात आलेल्या खर्चाची तपासणी,अनुसूचित जातीकरिता प्राप्त निधीचा वापर,कामांची अंमलबजावणी, तसेच लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्त्यांची स्थिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.याशिवाय लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सुधार योजना, रमाई घरकुल योजना, अनुकंपा तत्वावरील प्रकरणे व इतर संबंधित बाबींचाही आढावा घेण्यात आला.

ॲड.गोरक्ष लोखंडे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सुधार योजना व रमाई घरकुल योजनेसाठी उपलब्ध निधी असूनही अपेक्षित प्रमाणात खर्च न झाल्याबाबत संबंधित नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.तसेच या योजनांच्या कामांबाबत दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आणून देत, निधी तातडीने खर्च करून लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीसाठी नगर परिषद परंडा, भूम, वाशी, कळंब व धाराशिव येथील मुख्याधिकारी उपस्थित होते.तसेच सचिन कवले,सहायक आयुक्त, समाज कल्याण आणि आयुब शेख,वरिष्ठ सहायक यांचीही उपस्थिती होती. या आढावा बैठकीतून अनुसूचित जाती घटकांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सामाजिक न्यायाच्या उद्दिष्टांना गती देण्याच्या सूचना लोखंडे यांनी दिल्या.


 
Top