धाराशिव (प्रतिनिधी)- समाजासाठी प्रेरणादायी ठरणारे आठवे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे पार पडले.ईटकूर, ता. कळंब येथील 65 वर्षीय कै. आशाबाई गोविंद गंभीरे यांचे उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या जिवंतपणी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार व पूर्वी केलेल्या संकल्पानुसार त्यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धाराशिव येथे करण्यात आले.

कै.आशाबाई गंभीरे व त्यांचे पती गोविंद गंभीरे या वृद्ध दाम्पत्याने जिवंतपणीच देहदानाचा संकल्प केला होता. पत्नीच्या निधनानंतर पती गोविंद गंभीरे यांनी हा संकल्प प्रत्यक्षात उतरवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी मोलाची मदत होणार आहे. या देहदानामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीररचना अभ्यास व संशोधनासाठी उपयुक्त संधी मिळणार असून, भविष्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम होण्यास हातभार लागणार आहे. शरीररचनाशास्त्र विभागाच्या नियोजनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.

या कार्यात डॉ.स्वाती पांढरे (प्राध्यापक व विभाग प्रमुख, शरीररचनाशास्त्र विभाग), डॉ. विश्वजीत पवार (प्राध्यापक व विभाग प्रमुख,न्यायवैद्यकशास्त्र विभाग), डॉ.सुवर्णा आनंदवाडीकर (सहयोगी प्राध्यापक), डॉ.नितीन भोसले (प्रभारी वैद्यकीय अधीक्षक), डॉ. विवेक कोळगे (सहाय्यक प्राध्यापक, शरीरविकृतीशास्त्र विभाग तथा प्रभारी प्रशासकीय अधिकारी), डॉ.अरबाज ढवळीकर (निवासी वैद्यकीय अधिकारी), अधिसेविका  सुमित्रा गोरे, प्रशांत बनसोडे (प्रयोगशाळा तंत्रज्ञ),वरिष्ठ लिपिक जीवन गंभीरे तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. संपूर्ण प्रक्रियेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी देहदान करणाऱ्या गंभीरे कुटुंबीयांचे विशेष आभार मानून,हे कार्य वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षण व प्रशिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे नमूद केले. गंभीरे कुटुंबीयांनी घेतलेल्या या संवेदनशील व समाजहिताच्या निर्णयामुळे सर्वत्र सकारात्मक भावना व्यक्त होत असून, समाजात देहदानाविषयी जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.


 
Top