धाराशिव (प्रतिनिधी)-  आगामी 2026 जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाडोळी (आ.), ता. धाराशिव गटातून भारतीय जनता पक्षाकडे ॲड. अजित व्यंकटराव गुंड यांनी जिल्हा परिषद सदस्यपदासाठी अधिकृत इच्छापत्र सादर केले आहे. 

आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजिसिंह ठाकूर, माजी आमदार बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितिन काळे, संताजी चालुक्य-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचा विकासाचा अजेंडा प्रभावीपणे राबवून पाडोळी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असल्याचे ॲड. अजित गुंड यांनी स्पष्ट केले आहे. ॲड. अजित गुंड हे रुपामाता उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक असून शेती, सहकार, उद्योग, बँकिंग व शिक्षण या क्षेत्रांचा समन्वय साधत त्यांनी ग्रामीण भागात सर्वसमावेशक विकासाचे कार्य उभे केले आहे. दूध प्रक्रिया, ऊस उत्पादन व अन्न प्रक्रिया उद्योगांमुळे शेतकरी, दूध व ऊस उत्पादक तसेच लघुउद्योजकांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. रुपामाता अर्बन व मल्टीस्टेट बँकेच्या माध्यमातून शेतकरी, महिला बचत गट व उद्योजकांना अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात येत असून समूहाच्या उपक्रमांमुळे धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यांत रोजगारनिर्मितीस चालना मिळाली आहे. तसेच पाडोळी, लासोना व धाराशिव येथे सुरू करण्यात आलेल्या शैक्षणिक संस्थांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

ॲड. अजित गुंड यांना भक्कम सामाजिक व राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे चुलते सुधाकर गुंड गुरुजी हे जिल्हा परिषद धाराशिवचे माजी उपाध्यक्ष राहिले असून वडील ॲड. व्यंकटराव गुंड हे रुपामाता उद्योग समूहाचे चेअरमन व भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांच्या मातोश्री माजी जिल्हा परिषद सदस्य असून आजोबांपासून संपूर्ण कुटुंब जनसंघ-भाजप परिवाराशी निष्ठेने कार्यरत आहे.

 
Top