भूम (प्रतिनिधी)-  शहरातील पशुपालक वस्ताद अमोल वीर यांच्या ‌‘सोन्या किंग‌’ या रेड्याने महाराष्ट्र केसरी पशू पद पटकावून केवळ एक मानाचा किताब मिळवला नाही, तर माणुसकीचा विजयही शहरासमोर उभा केला आहे. धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज व हजरत ख्वाजा शमशोदिन उरुसानिमित्त दरवर्षी भरणाऱ्या भव्य रेड्यांच्या प्रदर्शनात यंदा चुरशीचा सामना पाहायला मिळाला. लातूर येथील अर्जुन या नामांकित रेड्याशी झालेल्या प्रदर्शनात सोन्या किंगने ताकद, डौल आणि दमदार कामगिरीच्या जोरावर बाजी मारली.

या प्रदर्शनानंतर आयोजक व पशुपालकांच्या वतीने सोन्या किंगला ‌‘महाराष्ट्र केसरी पशू‌’ हा बहुमान देण्यात आला. या यशामुळे भूम शहरात आनंदाचे वातावरण पसरले असून सोन्या किंग या रेड्याला प्रदर्शनात दमदार कामगिरी करण्यासाठी तयार केल्याने विविध भागात पशुप्रेमींकडून अमोल वीर यांचा जाहीर सत्कार करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीतील राजकीय कटुता या क्षणी बाजूला राहिली. प्रदर्शनाच्या ठिकाणी परस्पर विरोधी गटातील कार्यकर्तेही भूम शहराची शान असलेल्या सोन्या किंगचे प्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थित होते. यात सोन्या किंग विजयी होताच शहरातील पशु प्रेमी भावुक झाले. व एकमेकांना मिठी मारत आनंद व्यक्त करताना दिसले. हे दृश्य शहरासाठी प्रेरणादायी ठरले. 

राजकारणापेक्षा माणुसकी मोठी असते, हे सोन्या किंगने बाजी मारल्याने भूम शहराला पाहण्यास मिळाले आहे. यावेळी अमोल वीर,मधुकर लोंढे,अमर जमादार, अक्षय गाढवे, अभी सावंत, सूरज स्वामी, उमेश वीर, राम वीर, अविनाश वीर, अतुल वीर, अवधूत गाढवे यांच्या सह पशु प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top