धाराशिव (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवींचा शाकंभरी नवरात्रोत्सव 28 डिसेंबरपासून अत्यंत भक्तिभावाच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असून, या पवित्र उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असलेली भव्य जलयात्रा आज मोठ्या थाटामाटात संपन्न झाली. शेकडो महिला भगिनींच्या सहभागाने निघालेल्या या जलयात्रेमुळे संपूर्ण तुळजापूर नगरी भक्तिरसात न्हालेली दिसून आली.

धार्मिक मान्यतेनुसार देवी पार्वतीचा ‌‘शाकंभरी‌’ अवतार पौष शुक्ल अष्टमीच्या दिवशी साकार झाला. अन्नधान्य, वनस्पती आणि समृद्धीची अधिष्ठात्री देवी म्हणून शाकंभरी देवींची पूजा केली जाते. या श्रद्धेच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात दरवर्षी पौष शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. याच परंपरेनुसार यंदाही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

नवरात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या जलयात्रेला पापनाश तीर्थ कुंडातून प्रारंभ झाला. पवित्र जलाने भरलेले कलश डोक्यावर घेत, पारंपरिक वेशभूषेत शेकडो महिला भगिनींनी या जलयात्रेत भक्तिभावाने सहभाग नोंदवला. संबळाच्या कडकडाटात, ढोल-ताशांच्या गजरात, भक्तिगीतांच्या निनादात आणि आई राजा उदो उदो च्या जयघोषात निघालेली ही मिरवणूक तुळजाभवानी मंदिरापर्यंत पोहोचली. गाभाऱ्यात विधिवत जलअर्पण करण्यात आले.

जलयात्रेतील रथावर विराजमान असलेल्या शाकंभरी देवींच्या प्रतिमेची विशेष आकर्षक सजावट करण्यात आली होती. विविध प्रकारचा भाजीपाला (शाक) आणि फळांचा वापर करून केलेली ही सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. अन्नधान्य व समृद्धीचे प्रतीक असलेल्या देवी शाकंभरींच्या या स्वरूपाने भाविकांमध्ये श्रद्धा, कृतज्ञता आणि भक्तिभाव अधिक दृढ झाला.

या भव्य जलयात्रेत महिला भगिनींसोबतच गोंधळी, आराधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या तालावर आणि भक्तिरसपूर्ण वातावरणात संपूर्ण मिरवणूक अत्यंत आनंदी व भक्तिमय वातावरणात पार पडली. मिरवणुकीत सहभागी झालेले घोडे आणि सजवलेल्या बैलगाड्या या देखील भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरल्या.या पवित्र सोहळ्याला अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, विश्वस्त तथा तहसीलदार अरविंद बोळंगे, नगराध्यक्ष विनोद गंगणे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, उपाध्ये बंडू पाठक, शाकंभरी नवरात्र उत्सवातील यंदाचे यजमान उल्हास कागदे, लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, अनुप ढमाले, रामेश्वर वाले, राजकुमार भोसले, प्रवीण अमृतराव, अनिल चव्हाण, सिद्धेश्वर इंतुले, नागेश शितोळे, जयसिंग पाटील, महेंद्र आदमाने, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, अमरराजे कदम, अनंत कोंडो, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी-कर्मचारी, पुजारी बांधव तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top