धाराशिव (प्रतिनिधी)- नियोजित लातूर-कल्याण (जनकल्याण द्रुतगती मार्ग) हा महामार्ग धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा मार्ग अधिक फायदेशीर आणि सोयीचा व्हावा, यासाठी या महामार्गाची आखणी लातूर, कळंब-पारा-ईट, खर्डा,जामखेड, अहिल्यानगर, कल्याण अशा सुधारित मार्गाने करण्याची मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात खासदारांनी सविस्तर निवेदन देऊन या बदलामुळे होणाऱ्या फायद्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गडकरी यांच्याकडे मागणी करताना या मार्गाने लातूर-कल्याण मार्ग नेल्यास सध्याच्या प्रस्तावित मार्गापेक्षा कळंब-ईट-खर्डा हा सुधारित मार्ग अवलंबल्यास प्रवासाचे एकूण अंतर अंदाजे 60 ते 70 किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि इंधनाची मोठी बचत होईल. धाराशिव जिल्हा हा केंद्र सरकारच्या आकांक्षी जिल्हा योजनेत आहे. जिल्ह्यात मोठ्या उद्योगांचा अभाव असल्याने बेरोजगारी मोठी आहे. हा महामार्ग जिल्ह्याच्या या भागातून गेल्यास दळणवळण सुधारेल आणि उद्योगधंद्यांना चालना मिळेल. हा मार्ग जिल्ह्याच्या कृषी पट्ट्यातून जात असल्याने कळंब आणि आसपासच्या भागातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल मुंबई, ठाणे आणि कल्याण सारख्या बाजारपेठांमध्ये जलदगतीने पाठवणे शक्य होईल. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण होणे ही काळाची गरज आहे. या द्रुतगती मार्गाच्या रचनेत बदल केल्यास जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो, असा विश्वास खा. ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
