धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव रोटरी क्लबच्या माध्यमातून वंचित समाज घटकांच्या परिवर्तनाची चळवळ गेली तब्बल 33 वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. या सामाजिक बांधिलकीच्या वाटचालीत रोटरी क्लब धाराशिवने भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेला 40 हजाराचा धनादेश प्रदान करून समाजोपयोगी कार्याला बळ दिले.
भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठानतर्फे यमगरवाडी सेवा प्रकल्प, पालावरच्या अभ्यासिका-शाळा तसेच भटके-विमुक्त विकास परिषद अशा उपक्रमांद्वारे दुर्लक्षित घटकांसाठी मोलाचे कार्य केले जाते. सध्या महाराष्ट्रभरात 54 वस्त्यांवर पालावरच्या शाळा चालविल्या जात असून, या शाळांमधून मुलांना संस्कार, शिक्षण व व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे दिले जात आहेत. धाराशिव शहर व परिसरातील वासुदेव वस्ती, वडार वस्ती, बंजारा वस्ती, राजगोंड वस्ती तसेच येडशी परिसरात एकूण 160 विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळतो. या मुलांसाठी दरमहा खाऊ वाटपासाठी सुमारे 14 हजार रूपये खर्च येतो. पालावरच्या या शाळा वर्षातून एकूण दहा महिने नियमितपणे सुरू असतात. या उपक्रमासाठी आर्थिक हातभार म्हणून रोटरी क्लब धाराशिवने 40 हजाराचा धनादेश आज प्रदान केला. यावेळी रोटरी क्लब अध्यक्ष रंजीत रणदिवे, सचिव प्रदीप खामकर तसेच शहापूरकर सर उपस्थित होते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण व संस्कार पोहोचविण्यासाठी रोटरी क्लब धाराशिवचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
