तेर (प्रतिनिधी)- आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्याच्या अनुषंगाने मित्र कार्यालय, मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
या बैठकीत जिल्ह्यातील तेर, तुळजापूर आणि नळदुर्ग या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठिकाणांचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्याच्या अनुषंगाने सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. प्राचीन काळात रोम साम्राज्याशी व्यापारसंबंध असलेल्या, ऐतिहासिक महत्त्वाच्या तगर अर्थात आपल्या तेर नगरीचा हेरिटेज व्हिलेज म्हणून विकास करण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. या माध्यमातून तेरच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय वैभवाला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्याचा उद्देश आहे. अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. तुळजापूर परिसरात वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट, भव्य उद्यान विकसित करण्यासह पाचुंदा तलाव परिसरात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या अनुषंगाने महत्त्वाची चर्चा झाली. हेलियम बलून, वॉटर स्पोर्ट्स यांसारख्या आधुनिक व आकर्षक सुविधा उपलब्ध करून पर्यटकांना आकर्षित करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे.
यासोबतच नळदुर्ग किल्ला व परिसरात पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उभारणे, तसेच तुळजापूर येथे सुरू असलेल्या सर्वांगीण विकासकामांमधून अधिकाधिक भाविक व पर्यटक आकर्षित होतील, अशा दृष्टीने नियोजन करण्यावरही भर देण्यात आला आहे. अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. या बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता नरसिंह बंडे, एमआयडीसी व्यवस्थापकीय संचालक निलेश घटणे, पुरातत्त्व विभागाने उपसंचालक हेमंत दळवी, पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालक जया वहाणे, तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्यासह संबंधित प्रमुख अधिकारी व सल्लागार उपस्थित होते.
