वाशी (प्रतिनिधी)- भगवद्गीता हा जीवनाचा खरा आधार असून तो माणसाला प्रत्येक परिस्थितीत मार्ग दाखवते. आजच्या धावपळीच्या व धक्काधक्कीच्या जीवनात येणारे उतार-चढाव हेच जीवन जिवंत असल्याचे प्रतीक आहेत. “जीवन का आधार गीता का सार” या विषयावर मार्गदर्शन करताना राजयोगिनी ब्रह्मकुमारी उषा दिदी यांनी जीवनातील वास्तव स्पष्ट केले.
उषा दिदी पुढे म्हणाल्या की, जसे ईसीजी मशीनवर दिसणारी रेषा वर-खाली होत असते, तेव्हाच माणूस जिवंत असल्याचे स्पष्ट होते. मात्र ती रेषा सरळ झाली, तर तो मृत्यूचा संकेत असतो. त्याचप्रमाणे जीवनात अडचणी, संकटे, संघर्ष आले म्हणजे घाबरून न जाता त्यांना धैर्याने सामोरे गेले पाहिजे. समस्यांपासून पळ काढण्याऐवजी त्यांच्याशी सकारात्मक दृष्टीकोनातून सामना करणे हाच खरा जीवनमंत्र आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
या प्रेरणादायी कार्यक्रमाला सुरेश कवडे, निचित चेडे, ॲड. प्रदीप देशमुख, ॲड. शांता देशमुख, डॉ. दयानंद कवडे, डॉ. दत्तात्रय कवडे, डॉ. उमादेवी बाराते, बर्वे (कृषी अधिकारी), भारत मोळवणे, छगन नाना मोळवणे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप राजयोगिनी ब्रह्मकुमारी सोमप्रभा बहनजी यांनी केला. त्यांनी आपल्या भाषणातून आध्यात्मिक जीवनशैलीचे महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन ब्रह्मकुमारी अनिता करवा यांनी प्रभावीपणे केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन वाशी येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सर्व परिवाराच्या वतीने तसेच ब्रह्मकुमारी डॉ. शारदा मोळवणे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
