धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा आज ज्याठिकाणी आहे, तिथवर तो आणण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले आहेत. त्यात छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते भुजंगराव नलावडे यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही. शिक्षण, क्रीडा, साहित्य आणि समाजकारणातील त्यांचा सक्रिय सहभाग लक्षवेधी असाच होता. जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करताना ते कधीच थकत नसत खऱ्या अर्थाने भुजंगराव नलावडे म्हणजे कौतुकसप्तर्षीच होते अशा शब्दात प्रा. ए. डी. जाधव यांनी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
धाराशिव येथील आई लॉन्स याठिकाणी शनिवारी मराठवाडा साहित्य परिषद आणि बी. आर. नलावडे बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने ठेवा आठवणींचा या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील तर शिक्षक आमदार विक्रम काळे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ एम. डी. देशमुख, माजी नगराध्यक्ष मधुकरराव तावडे, ग्रंथाच्या संपादिका कमलताई नलावडे, मसापचे अध्यक्ष नितीन तावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. धाराशिव शहरातील पालिकांच्या शाळेची गुणवत्ता आणि दर्जा राज्यपातळीवर दखल घेण्याइतपत सिद्ध करण्याचे काम नलावडे यांनी केले असल्याचे प्रा. जाधव यांनी सांगीतले. माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी जिल्हा परिषदांच्या शाळा नगरपालिकेकडे वर्ग करून घेण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागले याचा वृतांत सर्वांसमोर विषद केला. एम. डी. देशमुख आणि आमदार विक्रम काळे यांनी समोयोचीत मनोगत व्यक्त करीत आठवणींचा ठेवा पुढील पिढीसाठी दिशादर्शक असल्याचे सांगितले.
प्रारंभी शाळेतील मुलांनी प्रार्थना, विजयश्री अत्रे यांनी सुंदर गीत सादर केले. प्रास्ताविक मसापचे अध्यक्ष नितीन तावडे यांनी केले. तर सूत्रसंचलन रविंद्र केसकर यांनी केले. तर आभार अर्चना शितोळे यांनी मानले. अनुष्का नलावडे यांचे मनोगत सर्वांना भावूक करून गेले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अभिजित नलावडे, संतोष नलावडे, संजय शितोळे, मसापचे माधव इंगळे, बालाजी तांबे, विजय गायकवाड, बाळ पाटील, प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर, श्याम नवले, संजय धोंगडे, मधुकर हुजरे, राजेंद्र अत्रे यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
