धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने धाराशिव तहसील कार्यालय परिसरात सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नेते आणि इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत युती-आघाडीबाबत स्पष्टता नसल्याने अनेक उमेदवारांमध्ये प्रचंड धाकधूक निर्माण झाली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ असल्यामुळे बहुतांश पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली होती. युती व आघाडीच्या चर्चा अखेरपर्यंत सुरू असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी खबरदारी म्हणून एक अर्ज अपक्ष म्हणून, तर दुसरा अर्ज पक्षाकडून दाखल केला.
भारतीय जनता पार्टीकडून सर्व इच्छुक उमेदवारांना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. भाजपने शेवटपर्यंत अधिकृत उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम ठेवला होता. अखेर दुपारी अडीच वाजता मल्हार पाटील हे पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म घेऊन तहसील कार्यालयात दाखल झाले. मात्र नेमका कोणत्या उमेदवाराला एबी फॉर्म मिळाला, याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.
काँग्रेस व ठाकरे शिवसेनेचे एबी फॉर्म जमा
काँग्रेस पक्षाकडूनही इच्छुक उमेदवारांना एक अपक्ष व एक पक्षाचा अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दुपारी सुमारे दोन वाजून पन्नास मिनिटांनी काँग्रेसचा पक्षनेता एबी फॉर्म घेऊन तहसील कार्यालयात दाखल झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मात्र एबी फॉर्म वाटपात फारसा गोंधळ न करता उमेदवारांना वेळेत फॉर्म देण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असली तरी महायुतीबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.
शिवसेना शिंदे गटाचे धाराशिवकडे दुर्लक्ष
सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असतानाच धाराशिव तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून मात्र एकही प्रमुख नेता किंवा कार्यकर्ता उमेदवारी अर्ज दाखल करताना सक्रिय दिसून आला नाही. यासंदर्भात शिवसेना संपर्क प्रमुख राजन साळवी यांच्याशी संपर्क साधाला असता मी लोहारा- उमरगा येथे आहे. तेथील उमेदवारांचे फार्म भरणे चालू असल्याचे सांगितले. धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 12 गटांपैकी आणि पंचायत समितीच्या 24 गणांपैकी शिवसेना पक्षाकडून आतापर्यंत केवळ 8 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. अखेरच्या दिवशीही शिवसेनेकडून अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या अत्यल्प राहिल्याने तालुक्यातील शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपची राजकीय खेळी
दुसरीकडे भाजपकडून सर्व जागांवर स्वबळावर उमेदवार उभे करण्याची राजकीय खेळी दिसून येत आहे. त्यामुळे भाजपने एका गटातून व गणातून 4 ते 5 जणांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे धाराशिव तालुक्यात भाजप व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोनच पक्ष सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे संकेत आहेत. कालपर्यंत, म्हणजे 20 जानेवारीपर्यंत धाराशिव तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी 67 तर पंचायत समितीसाठी 52 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र आज अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने ही संख्या दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे काही कार्यकर्ते आणि उमेदवार वेळ संपल्यानंतर गेटवरच अडकल्याचे चित्रही पाहायला मिळाले.
