धाराशिव (प्रतिनिधी)- महानगरपालिका निवडणुकीमध्ये 70 जागा बिनविरोध आल्या आहेत. त्यामुळे सध्या निवडणुकीचे स्वरूप बदलले आहे. दमबाजी, दहशत, पैश्याचा गैरवापर यामुळे निवडणुका निकोप वातावरणात होत नाहीत. अशा वातावरणामध्ये काँग्रेस पक्षाने मिळविलेले यश हे विचारावर निरोगीपणे मिळविल्याचे मत माजी महसूलमंत्री व काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. 

माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असता बुधवार, दि. 21 जानेवारी रोजी सकाळी त्यांनी हॉटेल किंग्ज गार्डन येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी धाराशिव जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, नगर परिषदेचे माजी गटनेते खलील सय्यद, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहर काँग्रेसचे उमेश राजेनिंबाळकर विलास शाळू, सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, अभिषेक बागल, अक्षय जोगदंड, जयसिंग पवार, मन्सुर सय्यद, सरफराज काझी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, पहिल्या काळात ज्याप्रमाणे काँग्रेसने निरोगी वातावरणात निवडणुका घेतल्या त्याच वातावरणात विरोधीपक्षही निरोगी पध्दतीनेच वागला. मागील अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची मोठी घसरण दिसून आली. याला इव्हीएम मशीनवरील मतदान हेच कारण आहे. त्यामुळे आता जनतेतही संभ्रम निर्माण झाला आहे. तांदुळवाडी येथे काही तरूणांनी इव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेण्यात यावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या मागणीला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा देण्यासाठी आपण त्यांची भेट घेतली असल्याचे सांगून काँग्रेस पक्षाची विचारधारा ही लोकशाहीला पूरक आहे. पण जाती-पातीचे राजकारण करून सत्ताधारी पक्ष  लोकशाहीला बाधक असे राजकारण करत असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीजबिल याबाबत केंद्र व राज्यातील सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. शेतकरी आणि सर्वसामान्य व्यावसायिक, जनतेच्या अडचणी वाढत आहेत. त्यामुळे सरकारने योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या विचारधारेला मानणाऱ्या समविचारी पक्षांना सोबत घेवून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top