तुळजापूर (प्रतिनिधी)-  मकरसंक्रांतीचे औचित्य साधत शनिवार दि. 17 जानेवारी 2026 रोजी द स्कायलंड हॉटेल, नवीन बस स्थानक शेजारी महिलांच्या सन्मान व सबलीकरणासाठी भव्य हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका सौ. प्रियंका ताई विजयसर गंगणे यांच्या वतीने करण्यात आले. प्रभाग क्रमांक 7 व 10 मधील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सर्वधर्मीय महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे, यावेळी मुस्लिम महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती ही सामाजिक सलोख्याचे व महिला एकतेचे प्रतीक ठरली.

या प्रसंगी नगरसेविका सौ. प्रियंका ताई गंगणे यांनी उपस्थित महिलांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे ठामपणे सांगितले. महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक प्रश्नांसाठी पालिकेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. कार्यक्रमात महिलांसाठी आकर्षक भेटवस्तू, अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच उखाणे, संवाद आणि आपुलकीच्या गप्पांचा रंगतदार कार्यक्रम पार पडला. या उपक्रमामुळे परिसरातील महिलांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे आणि स्नेहाचे वातावरण निर्माण झाले.

जवाहर गल्ली, दीपक चौक, क्रांती गल्ली, गोपाळ नगर व लोहिया परिसरातील महिलांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सपना पांढरे, राजश्री शितोळे, आरती पांढरे, पल्लवी शिंदे, पूजा गंगणे, रोहिणी गंगणे, प्रतिक्षा गंगणे यांच्यासह सर्व महिला भगिनींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिला भगिनींचे मनापासून आभार मानण्यात आले. मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त महिलांना सन्मान देत त्यांना सबल बनवण्याचा हा उपक्रम शहरात विशेष चर्चेचा विषय ठरत असून, महिलांमध्ये मोठ्या समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

 
Top