तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्रीक्षेत्र तुळजापूर येथील विकासकामांसाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेमध्ये बाधित मालमत्ताधारकांना पूर्णपणे विश्वासात घेऊन ऑर्डर पद्धतीने अधिकाधिक मोबदला देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती उपविभागीय तथा भूसंपादन अधिकारी ओंकार देशमुख यांनी दिली. भूसंपादनाबाबत बुधवारी आयोजित प्राथमिक बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार माया माने, अभियंता राजकुमार भोसले, मंदिर संस्थानचे कर्मचारी तसेच बाधित मालमत्ताधारक उपस्थित होते. यावेळी मालमत्ताधारकांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, भूसंपादनाबाबत सध्या संभ्रमावस्था निर्माण झाली असून प्रशासनाने आम्हाला योग्य व सविस्तर माहिती द्यावी. तसेच या प्रक्रियेत आमचे सर्वस्व जाणार असल्याने समाधानकारक मोबदला मिळणे अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वी रेल्वे रस्ता मावेजासारखी प्रकरणे रखडली होती, तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावर बोलताना उपविभागीय तथा भूसंपादन अधिकारी ओंकार देशमुख म्हणाले की, भूसंपादन प्रक्रिया सर्वांना विश्वासात घेऊनच केली जाईल. प्रत्यक्ष जागेवर किती क्षेत्र आहे व कागदोपत्री किती क्षेत्र आहे, याची सखोल तपासणी करून मोजणी केली जाईल. ही मोजणी येत्या सोमवार किंवा रविवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. 


 
Top