तुळजापूर (प्रतिनिधी)- शिवसेना तुळजापूर तालुकाध्यक्ष अमोल जाधव व नगरसेवक किरण (टिनु) कदम यांनी आमदार सुरेश अण्णा धस यांची आष्टी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार धस यांचा श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा व कवळ्याची माळ देऊन सन्मान करण्यात आला.
या भेटीत तुळजापूर शहरातील ऐतिहासिक यात्रा मैदानाच्या जमीन हडप प्रकरणासह विविध स्थानिक व नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात्रा मैदान प्रकरणाच्या चौकशी अहवालास होत असलेल्या विलंबाबाबत यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आमदार धस यांच्याकडे व्यक्त केली.
नागरिकांच्या अडचणी व विकासात्मक मुद्द्यांवर संवाद
यावेळी यात्रा मैदानाशी संबंधित नागरिकांच्या अडचणी, तुळजापूर शहरातील विकासात्मक प्रश्न तसेच इतर स्थानिक समस्यांवर सकारात्मक व सखोल चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. ही भेट अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. तुळजापूरच्या सर्वांगीण हितासाठी संबंधित सर्व विषयांवर समन्वयाने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आल्याचेही समजते. या भेटीनंतर तुळजापूरच्या यात्रा मैदान प्रकरणासह इतर महत्त्वाच्या विषयांना गती मिळणार का, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.