धाराशिव(प्रतिनिधी)- शैक्षणिक, सामाजिक व वैचारिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे प्रा. सोमनाथ लांडगे यांना पुणे येथे आयोजित वर्ल्ड टूर्स अँड ट्रॅव्हल्स कार्निव्हल 2026 मध्ये एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
आकुर्डी, पुणे येथील श्री खंडोबा सांस्कृतिक भवन येथे दि. 17 जानेवारी 2026 रोजी हा भव्य व दिमाखदार पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमास एअर इंडिया एक्सप्रेसचे व्यवस्थापक सनी चोप्रा, पुणे विमानतळ एथिकल व्यवस्थापनाचे मनोज शर्मा, पुणे ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या श्वेता उंडरे, निलेश भन्साळी तसेच आयआयबीएम ग्रुपच्या सीईओ शिरिन वस्थानी आदी मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी प्रा. सोमनाथ लांडगे यांच्या समाजाभिमुख, विद्यार्थी-केंद्रित आणि गुणवत्ताधिष्ठित शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक विभाग, भारत सरकार पर्यटन विभाग, आयआयबीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि जेट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
प्रा. सोमनाथ लांडगे हे श्री साई श्रद्धा एज्युकेशन संस्थेचे संचालक असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सुमारे 16 जिल्ह्यांतील 400 हून अधिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नीट परीक्षेसाठी अल्प शुल्कात ऑनलाइन टेस्ट सिरीज उपलब्ध करून देत अनेक गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक संधी मिळवून दिली आहे. यासोबतच, धाराशिव येथे अल्प शुल्कात मुलींसाठी वसतिगृह चालवून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. श्री साई श्रद्धा सेवाभावी संस्थेमार्फत वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षण शुल्कासाठी सातत्याने आर्थिक मदत केली जाते. सध्या प्रा. सोमनाथ लांडगे हे बिल गेट्स ज्युनिअर कॉलेज, धाराशिव येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व पालक वर्गामध्ये समाधान, विश्वास व अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. या पुरस्कारामुळे धाराशिव परिसरासह संपूर्ण राज्यभरातील शिक्षकवर्ग, विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संस्थांमध्ये आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व स्तरांतून प्रा. सोमनाथ लांडगे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
