मुरुम (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील नाईक नगर सुंदरवाडी येथील श्री लाल बहादूर मागास समाजसेवा मंडळ, उमरगा संचलित विठ्ठल साई कनिष्ठ महाविद्यालयाच्या 19 वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाने, तसेच विठ्ठल साई माध्यमिक आश्रम शाळेच्या 17 वर्ष वयोगटातील मुले व मुलींच्या संघाने आणि व्हि. जे. प्राथमिक आश्रम शाळेच्या 14 वर्ष वयोगटातील मुले व मुलींच्या संघाने ता. जि. धाराशिव येथील शिंगोली आश्रम शाळेत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आश्रमशाळा खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत जिल्ह्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

ग्रामीण व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी कठोर सराव, शिस्त, संघभावना आणि जिद्दीच्या जोरावर हे दैदीप्यमान यश संपादन केले. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. मानिकरावजी राठोड साहेब व सचिव मा. श्री. योगेशजी राठोड साहेब यांनी सर्व विजयी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या संघांना यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी वेदकुमार सगर सर, संतोष केंद्रे सर, अशोक राठोड सर व टोपासिंग राठोड सर यांनी दिलेले नियोजनबद्ध व शिस्तबद्ध मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले. त्यांच्या प्रशिक्षणामुळे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, तांत्रिक कौशल्य व संघभावनेचा उत्कृष्ट विकास साधला गेला.

तसेच व्हि. जे. प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गोविंद चव्हाण सर, विठ्ठल साई माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, विठ्ठल साई कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव सर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर यश मिळावे अशा शुभेच्छा दिल्या.

या विजयामुळे श्री लाल बहादूर मागास समाजसेवा मंडळ, उमरगा संचलित संस्थांची शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा क्षेत्रातील भक्कम वाटचाल पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून नाईक नगर सुंदरवाडी व परिसरात आनंद व अभिमानाचे वातावरण पसरले आहे.

 
Top