भूम (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील पारगाव येथील पृथ्वीराज हॉटेल व लॉज येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून वाशी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत हॉटेल मालकासह हॉटेलचा एक नोकर व इतर चार ग्राहकांच्या विरोधात वाशी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई दि. 19 जानेवारी रोजी रात्री सुमारे साडेआठ वाजता करण्यात आली. छापा कारवाईत नंतर दोन पीडित मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील पारगाव येथील पृथ्वीराज हॉटेल व लॉज या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती वाशी पोलिसांना मिळाल्यावरून वाशी पोलिसांनी दि. 19 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक धाड टाकली. यावेळी सदरील हॉटेलच्या लॉजमध्ये वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने दोन महिला व इतर चार ग्राहक आढळून आले. यावेळी देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी पीडित दोन महिन्यांची सुटका केली व हॉटेलचा मालक श्रीपती उत्तमराव घुले, हॉटेलमधील नोकर महादेव विष्णू काळे दोघे राहणार पारगाव तालुका वाशी व ग्राहक म्हणून आलेले विशाल महादेव जुळे रा. भंडारवाडी ता. जि. बीड, भरत नवनाथ सुरवसे रा. वाकवड ता. भूम जि. धाराशिव, संदीप आबासाहेब गायकवाड रा. गिरवली ता. भूम जि. धाराशिव व अक्षय महादेव सालगुडे रा. नेकनूर ता. जि. बीड यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरोधात वाशी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजयसिंह भाळे, अंमलदार बळीराम यादव, विठ्ठल मलंगनेर, नसीर सय्यद, गोपीनाथ पवार, शिवा कोरडे तसेच महिला पोलीस अंमलदार ज्योती बहीरवाल यांच्या पथकाने कारवाई केली.
