धाराशिव, (प्रतिनिधी)- शिख धर्माचे नववे गुरु ‌‘हिंद-की-चादर‌’ श्री गुरु तेग बहादुर यांनी धर्मस्वातंत्र्य,मानवी हक्क आणि अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे लढा देत आपल्या प्राणांची आहुती दिली.प्रार्थना,परोपकार,सेवा,साधेपणा, निर्भीडपणा आणि इतरांच्या सेवेला महत्त्व देणारे त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत.त्यांच्या प्रवचनांचा व भजनांचा समावेश ‌‘गुरु ग्रंथ साहिब‌’मध्ये करण्यात आला असून, 17 व्या शतकात दिलेल्या त्यांच्या बलिदानामुळे भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेचे संरक्षण झाले.

मुघल सत्तेच्या विरोधात जाऊन भाई लकीशा बंजारा यांनी श्री गुरु तेग बहादुर यांच्या पवित्र पार्थिवाला आपल्या तांड्यातील घर जाळून अग्नी दिल्याची घटना भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्त्वाची मानली जाते.या त्यागामुळे शौर्य व बलिदानाची परंपरा अधिक दृढ झाली. सन 2025 हे श्री गुरु तेग बहादुर यांचे 350 वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने,त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा व त्यांच्या विचारांचे स्मरण व्हावे,यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्यात करण्यात येत आहे. नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2025 रोजी आयोजित विशेष कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर,जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज आयोजित बैठकीला जिल्हा क्षेत्रीय समितीचे सदस्य संतोष चव्हाण उपस्थित होते.कार्यक्रमाची माहिती घरोघरी पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना कडवकर यांनी दिल्या.

नांदेड येथील कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून जास्तीत जास्त नागरिक उपस्थित राहावेत,यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये श्री गुरु तेग बहादुर यांच्या जीवनावर आधारित माहितीपट व गीतांचे सादरीकरण,प्रभातफेरी,गायन, वक्तृत्व व निबंध स्पर्धा,डॉक्युमेंटरी वाचन, जागरण बैठक,प्रचार रथ,लाईट अँड साउंड शो तसेच विविध शासकीय बैठकीतून प्रचार करण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला.ग्रामीण भागातील वाड्या- वस्त्यांपर्यंतही कार्यक्रमाची माहिती पोहोचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.जिल्ह्यात चित्ररथाच्या या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर यांच्या विचारांचा प्रचार व त्यांच्या बलिदानाचे स्मरण सर्वस्तरांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.अशी माहिती श्री.चव्हाण यांनी यावेळी दिली.

 
Top