धाराशिव (प्रतिनिधी) - वेगाने बदलणाऱ्या आजच्या काळात शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल राखणे ही काळाची गरज बनली आहे. कोणत्याही पदवी समारंभात किंवा सार्वजनिक कार्यक्रमात आदर्श व्यक्ती व रोल मॉडेल्सचा उल्लेख केला जातो. मात्र सध्याच्या काळात जागतिक पातळीवर आदर्शांची कमतरता जाणवत आहे. अनेक अभ्यासक व मानसशास्त्रज्ञांच्या मते, आजची पिढी पूर्वीच्या पिढ्यांनी भोगलेल्या संघर्षांचा अनुभव घेतलेली नसल्याने कष्टांचे महत्त्व कमी होत चालले असल्याचे प्रतिपादन राज्यपाल महाराष्ट्र यांचे सचिव सनदी अधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी दि.२० जानेवारी रोजी केले.

तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या १९ व्या पदवीदान समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी संस्थेचे कुलपती प्रा. डी पी सिंग, कुलपती प्रा बद्री नारायण तिवारी, कुलसचिव नरेंद्र मिश्रा, तुळजापूर निदेशक प्रा. बाळ नागोराव राक्षसे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ नारनवरे म्हणाले की पूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध ठिकाणी जावे लागे, मोबाईलपासून दूर राहून शिस्तबद्ध जीवन जगावे लागे. आज ही परिस्थिती सर्वांसाठी तशी नसली तरी प्रत्येक पिढीवर सामूहिक जबाबदारी असते. जग पूर्णपणे समान नसले तरी एकत्रित प्रयत्नांतूनच प्रगती साधता येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आज संपूर्ण जगात तरुण लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही लोकसंख्या योग्य दिशेने वळवली गेली तर ती देशासाठी मोठी संपत्ती ठरू शकते. केवळ पदव्या पुरेशा नसून कौशल्यांना अधिक महत्त्व आहे. शिक्षणातून ज्ञान मिळते. मात्र त्या ज्ञानाचा प्रभावी वापर कौशल्यांवर अवलंबून असतो असे त्यांनी नमूद केले. तर सध्या अनेक विद्यार्थी कृषी, अभियांत्रिकी, नर्सिंग अशा विविध क्षेत्रांत शिक्षण घेत आहेत. तरीही रोजगाराची मोठी दरी कायम आहे. शाळेतील १०० विद्यार्थ्यांपैकी केवळ २८ विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी पात्र ठरतात. तर उर्वरित विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासाची कमतरता दिसून येत असल्यामुळे शिक्षण पद्धतीत मूलभूत बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे केवळ वर्गातील व्याख्यानांपुरते शिक्षण न ठेवता प्रत्यक्ष अनुभव, उदाहरणे, चित्रे आणि जिज्ञासा निर्माण करणारी शिकवण अधिक परिणामकारक ठरू शकते. विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल आणि नवकल्पनांची वृत्ती विकसित होणे गरजेचे आहे.

काही वर्षांपूर्वी १६ हजार गटांमधून ५८ शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झाली. आज या कंपन्यांची उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यावरून सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयाची जाणीव करून देणे किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट होते. कोणीही जन्मतः परिपूर्ण नसतो. मात्र समस्या ओळखून त्यावर उपाय शोधणे हीच खरी जबाबदारी आहे. इनक्युबेशन सेंटर, स्टार्टअप्स आणि नव्या कल्पनांमधून अनेक संधी निर्माण होऊ शकतात. स्टार्टअप्ससाठी मागवलेल्या कल्पनांपैकी निवडक कल्पनांना निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने संधी सर्वांसाठी खुल्या असल्याचे दिसून येते.

आजचा विद्यार्थी केवळ स्वतःच्या भविष्यासाठी नव्हे, तर समाजातील दुर्लक्षित घटकांच्या भविष्यासाठीही जबाबदार आहे. कोणालाही दुर्लक्षित समजू नये. वर्गात मागे बसलेला विद्यार्थीही उद्या मोठा उद्योजक, नेता किंवा समाजसेवक होऊ शकतो. कोणतीही व्यक्ती कितीही हुशार असली, तरी संघभावना महत्त्वाची असते. कधी नेतृत्व करावे लागते, तर कधी संघातील सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडावी लागते. शेवटी, भारतातील प्रत्येक आवाज महत्त्वाचा आहे. त्या सर्व आवाजांना ऐकून, समजून घेऊन देशाच्या प्रगतीसाठी काम करणे, हीच खरी शैक्षणिक आणि सामाजिक यशाची पावती असल्याचे डॉ प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top