धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात अविनाश खापे यांनी संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यासोबत झालेला फोनवरील संभाषणाचा ऑडिओ रेकॉर्ड समाजमाध्यमांवर व्हायरल केला होता. या ऑडिओमध्ये खापे यांनी सामान्य शिवसैनिकांच्या भावना व्यक्त करत जिल्ह्यात भाजपा शिवसेनेला संपवत असून, संपर्कप्रमुख राजन साळवी हे भाजपाला पूरक भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप केला होता. यावरून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कारवाई करण्याचे संकेत दिले होते. अखेर अविनाश खापे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

इतकेच नव्हे तर, शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांचे एबी फॉर्म संपर्कप्रमुखांनी भाजप नेत्यांकडे नेऊन दिल्याचा आरोपही खापे यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. त्यांच्या या भूमिकेला जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. या घडामोडीनंतर रविवार दिनांक 25 जानेवारी रोजी शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांच्या निवासस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक व संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी प्रचंड गोंधळ घातला होता. 

या घटनेनंतर तब्बल आठ दिवसांनी युवा सेनेचे सचिव राहुल लोंढे यांनी पत्र काढून अविनाश खापे यांना पक्षातून निलंबित केल्याचे जाहीर केले. दुसरीकडे, शिवसेना व भाजपा यांच्यात जागावाटपावरून निर्माण झालेला वाद पालकमंत्री प्रताप सरनाईक व आमदार राणा पाटील यांच्यातील चर्चेनंतर मिटला असून, महायुती म्हणून जिल्ह्यात एकत्र काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच असल्याचा आरोप शिवसैनिकांकडून केला जात आहे. 

 
Top