धाराशिव (प्रतिनिधी)-जळकोट (ता. तुळजापूर): आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत जळकोट गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस (आय) आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. या आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विजयाचा विश्वास व्यक्त केला.
या सभेत जळकोट जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार प्रतिक्षा गोपाळ सुरवसे, तसेच जळकोट पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार मोहन लालसिंग चव्हाण आणि सुवर्णा सिन्नप्पा गुंजोटे यांच्या प्रचारार्थ खासदार निंबाळकर यांनी रान उठवले. ग्रामीण विकासाची ध्येयधोरणे: महाविकास आघाडीची ठाम भूमिका आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाची स्पष्ट दिशा यावेळी मांडण्यात आली. शेतकरी, महिला आणि युवकांच्या मूलभूत प्रश्नांवर खासदार निंबाळकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून विकास, न्याय आणि लोकहितासाठी सातत्याने संघर्ष करत राहील, असा शब्द त्यांनी मतदारांना दिला.
यावेळी बोलताना तिन्ही उमेदवारांनी जनतेशी संवाद साधत, निवडून आल्यानंतर प्रामाणिक सेवा, पारदर्शक कारभार आणि जनहितासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. जळकोट येथे झालेल्या या सभेला शिवसैनिक, काँग्रेस (आय) कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. "विकास आणि विश्वासाची ही आघाडीच जळकोटचा चेहरामोहरा बदलेल," असा सूर उपस्थित नागरिकांमधून उमटत होता.
