धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात विकासाची भूमिका मांडणारे, अभ्यासू सक्षम नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धक्कादायक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रासह धाराशिव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेनंतर सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त होत असताना, याच काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने प्रचार सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट शेअर करत महत्त्वाचे आवाहन केले आहे. प्रचाराच्या अनुषंगाने सर्व सहकारी, मित्रपक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि उमेदवार यांनी कोणत्याही प्रकारचे हार, तुरे, सत्कार, वाजंत्री, बँड, हलगी, फटाके यांचा वापर टाळावा, तसेच प्रचार पूर्णतः साध्या आणि संयमित पद्धतीने राबवावा, अशी सविनय विनंती त्यांनी केली आहे.
अजित दादा पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेल्या न भरून निघणाऱ्या नुकसानीचे भान ठेवूनच ही निवडणूक लढवावी, अशी नम्र भूमिका खासदार निंबाळकर यांनी मांडली असून त्यांच्या या पोस्टला समाजमाध्यमांवरून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.शिवाय एरव्हीसारखी प्रचार यंत्रणा यापुढील काळात न वापरता साध्या पद्धतीने प्रचार केला जाणार आहे.
