धाराशिव (प्रतिनिधी)-  रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने दिनांक 01 जानेवारी 2026 ते 05 जानेवारी 2026 या कालावधीत जिल्हाभर जनजागृती करण्यात आली आहे. 

येडशी टोल नाका येथे मोटार वाहन निरीक्षक सुनील शिंदे व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विशाल भगरे यांनी टोल नाका कर्मचारी,वाहतूक पोलीस कर्मचारी व वाहन चालकांना रस्ता सुरक्षेबाबत प्रबोधन केले.त्या ठिकाणी बॅनर प्रदर्शित करण्यात आले तसेच माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. तसेच मोटार वाहन निरीक्षक सुशांत धुमाळे व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सिद्धेश्वर मस्के यांनी वाहन चालकांना रस्त्यावर वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये,दुचाकीधारकांनी हेल्मेट परिधान करावे,चारचाकी वाहनधारकांनी सीट बेल्टचा वापर करावा,अपघातग्रस्तांना मदत करावी. तसेच मद्यपान करून वाहन चालवू नये,याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पारगाव टोल नाका येथे मोटार वाहन निरीक्षक सचिन बंग व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी बहीर यांनी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहन चालकांना रस्ता सुरक्षा संबंधी माहिती पुस्तिकांचे वाटप केले.यावेळी मोबाईलचा वापर टाळणे, दुचाकीधारकांनी हेल्मेट वापरणे, चारचाकी वाहनधारकांनी सीट बेल्ट लावणे,अपघातग्रस्तांना मदत करणे व मद्यपान करून वाहन न चालवणे याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच तेथे बॅनर प्रदर्शित करून माहितीपत्रके वितरित करण्यात आली. 

तलमोड टोल नाका येथे मोटार वाहन निरीक्षक उदयकुमार केंबळे,मोटार वाहन निरीक्षक विकास डोंगरे व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कुलदीप पवार यांनी टोल नाका कर्मचाऱ्यांसोबत रस्ता सुरक्षेचे स्टिकर्स लावले.तसेच बॅनर प्रदर्शित करून माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले व वाहन चालक तसेच नागरिकांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 
Top