वाशी (प्रतिनिधी)- मराठी भाषेला वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजजागृतीचे बळ देणारे, मराठी पत्रकारितेचे आद्य जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दि. 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केलेले ‘दर्पण’ हे केवळ वृत्तपत्र नव्हते, तर सत्य, विवेक आणि लोकहिताची मशाल होती. त्या ऐतिहासिक कार्याच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येणारा दर्पण दिन (पत्रकार दिन) वाशी येथे तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने आदर, कृतज्ञता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाशी तहसील कार्यालयाचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक अभय सिंह भाळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले व श्रीफळ फोडून अभिवादन करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक शंकर शिंदे म्हणाले की, “पत्रकारांचा आवाज हा सर्वसामान्य जनतेचा आवाज बनला पाहिजे. पत्रकारिता ही निष्पक्ष, निर्भीड व सकारात्मक असावी. समाजातील चांगल्या व वाईट दोन्ही बाबी निर्भयपणे समाज, शासन व प्रशासनासमोर मांडल्या पाहिजेत. पत्रकार हे लोकशाहीचे कणा असून सर्वसामान्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य ते निस्वार्थीपणे करतात. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील. आपण निडरपणे लेखन करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांनी सांगितले की, “पत्रकारिता करताना कोणत्याही विषयाच्या सकारात्मक तसेच नकारात्मक अशा दोन्ही बाजूंची सखोल माहिती घेऊनच बातमी सादर केली पाहिजे. त्यामुळे समाजासमोर खरे वास्तव येते आणि लोकशाही अधिक सक्षम होते,” असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार बळीराम जगताप, गौतम चेडे, शहाजी चेडे, नवनाथ टकले, नेताजी नलवडे, राहुल शेळके, शोएब काझी, शिवाजी गवारे, विलास गपाट, दत्तात्रय भराटे, विकास भराटे, विशाल खामकर, मिसबा काझी यांच्यासह समाजसेवक दादासाहेब चेडे, बापू कदम, संजय होळकर, गजानन भारती, संजय कवडे, राहुल घुले तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
