धाराशिव (प्रतिनिधी)- केवळ शिवजयंती साजरी करण्यापुरते मर्यादित न राहता समाजाच्या गरजा ओळखून प्रत्यक्ष कृतीत उतरावे, या भूमिकेतून मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीने यंदा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील गरजू कुटुंबांसाठी सर्वधर्मीय, बिगर हुंडा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

202425 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. आर्थिक अडचणींमुळे मुलामुलींचे शिक्षण व विवाह करणे अनेकांना कठीण झाले आहे. ही सामाजिक गरज लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे प्रा. डॉ. आमदार तानाजी सावंत यांनी सांगितले. “हा विवाह सोहळा केवळ धाराशिवसाठी नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे,” असे ठळकपणे नमूद करत त्यांनी गरजू आई-वडिलांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावर्षी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे असून, त्यांच्या संकल्पनेतून हा समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहे.

हा सर्वधर्मीय बिगर हुंडा सामुदायिक विवाह सोहळा 8 फेब्रुवारी 2026 रोजी धाराशिव शहरातील कन्या प्रशाला प्रांगणात भव्य मात्र साधेपणात संपन्न होणार असून, शिवजयंतीच्या माध्यमातून समाजसेवेचा नवा व प्रेरणादायी आदर्श निर्माण होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


 
Top