तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजाभवानी मंदिरकडे येणाऱ्या तिन्ही रस्ते अतिक्रमणमुक्त सीसीटीव्हीच्या कक्षेत येणार आहेत. तुळजापूर तीर्थक्षेत्रात स्वच्छता व मंदिर परिसर विकसित करून स्वच्छ तुळजापूर, सुंदर तुळजापूर घडवण्याची आमची ठाम संकल्पना असल्याचे प्रतिपादन नूतन नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर संवाद साधताना नगराध्यक्ष गंगणे म्हणाले की, संवादातूनच समस्या सुटतात. सकारात्मक विचार ठेवून तीर्थक्षेत्राचा चेहरा बदलण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक असून यासाठी पत्रकार व शहरवासीयांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना गंगणे यांनी सांगितले की, स्वच्छतेवर आमचा सर्वाधिक भर असून सध्या नादुरुस्त घंटागाड्या दुरुस्तीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. पुढील काळात शहरातील स्वच्छतेबाबत नगरपरिषद जातीने लक्ष देणार आहे.


या राबवणार योजना

अतिक्रमणाबाबत बोलताना ते म्हणाले की, श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात वाहनांना प्रवेशबंदी राहील. कोणालाही रस्त्याच्या मधोमध बसून व्यवसाय करू दिला जाणार नाही. स्वच्छ तुळजापूर सुंदर तुळजापूर, शहर व मंदिर परिसरात स्वच्छतेवर सर्वाधिक भर, रस्त्यांवरील अतिक्रमण हटवणार; व्यापाऱ्यांसाठी लाईन पद्धत, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एसपी दर्जाचा अधिकारी नेमण्याचे प्रयत्न, तुळजापूरमध्ये प्लास्टिक बंदी लागू करणार, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष नियोजन, आठवडा बाजारातच भाजी मंडई कार्यान्वित, जिल्हा परिषद जुनी कन्या शाळेत अंडरग्राउंड वाहनतळाचा प्रस्ताव वर उमेद हॉल, नगरपालिकेची प्रमाणपत्रे ऑनलाइन देण्याची योजना आदीबाबत नगराध्यक्ष गंगणे यांनी माहिती दिली. तुळजापूरचा चेहरा बदलण्यासाठी शहरवासीयांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल रोचकरी यांनी केले. यावेळी नगरपरिषद कर्मचारी चव्हाण, सुनील रोचकरी, अमर हंगरगेकर, अनुजा कदम, प्रा. संभाजीराव भोसले, आनंद कंदले, विजय कंदले, सागर कदम, शांताराम पेंदे, लखन पेंदे, नरेश अमृतराव तसेच नगरसेवक व विविध पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top