धाराशिव (प्रतिनिधी)- दहावी व बारावीनंतर योग्य करिअरची निवड कशी करावी, मानसशास्त्रीय चाचण्यांच्या आधारे भविष्यातील करिअरविषयक निर्णय कसे घ्यावेत. या उद्देशाने श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तुळजापूर येथे 16 जानेवारी 2026 रोजी मानसशास्त्रीय कलचाचणी व करिअर समुपदेशन कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांची जागतिकस्तरावर वापरली जाणारी इंटरेस्ट प्रोफाईलर ही मानसशास्त्रीय कलचाचणी घेण्यात आली.
या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतातील एकूण 52 प्रमुख करिअर क्षेत्रांमधील उपलब्ध असलेल्या शेकडो जॉब रोल्सपैकी आपल्या आवडीनिवडी,क्षमता व कौशल्यांशी सुसंगत जॉब रोल निवडण्यास मदत होणार आहे.ही चाचणी जागतिक स्तरावर कार्यस्थळावरील मूल्ये (वर्किंग व्हॅल्यूज) ओळखण्यासाठी वापरली जाते.या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू,कार्यमूल्ये तसेच त्यानुसार योग्य करिअर पथ निवडण्याबाबत स्पष्टता मिळाली.
या मानसशास्त्रीय कलचाचणीमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्व-ओळख निर्माण होऊन भविष्यातील करिअरविषयक निर्णय वैज्ञानिक दृष्टिकोनातून घेण्यास मदत झाली. श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सुमारे 89 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रम व रोजगार मंत्रालयाचे समुपदेशक दत्तात्रय सुभाष कांबळे,मॉडेल करिअर सेंटर,लातूर यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा कौशल्य विकास विभागाच्या उपायुक्त विद्या शितोळे, सहाय्यक आयुक्त संजय गुरव तसेच दत्ता चव्हाण (परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी सहाय्यक आयुक्त,धाराशिव) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. या उपक्रमासाठी सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य वैजनाथ घोडके,शिक्षकवृंद व कर्मचारी तसेच जिल्हा कौशल्य विकास कार्यालय, धाराशिव येथील बाबासाहेब शेटे व विद्या नाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.