धाराशिव (प्रतिनिधी)- ज्ञान आणि मनोरंजनाचा सुरेख संगम साधत श्री सिद्धेश्वर निवासी विद्यालय, वरवंटी यांची दोन दिवसीय शैक्षणिक सहल दि. 11 व 12 जानेवारी 2026 रोजी यशस्वीरीत्या पार पडली. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी वेरूळ लेणीतील कैलास मंदिर, घृष्णेश्वर मंदिर, बेबी का मकबरा, जायकवाडी प्रकल्प तसेच पैठण येथील संत एकनाथ महाराज मंदिर अशा ऐतिहासिक, पर्यटन व धार्मिक स्थळांना भेटी दिल्या.

या सहलीत एकूण 45 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यासोबतच विद्यार्थ्यांना बीडकीन (छत्रपती संभाजीनगर) येथील मेसर्स मालखरे सिल्व्हर काँक्रीट प्रा. लि. च्या रेडी मिक्स काँक्रीट प्लांटला भेट देण्यात आली. या माध्यमातून औद्योगिक क्षेत्राची प्रत्यक्ष माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांचा अनुभव अधिक समृद्ध झाला.

पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेणे, विविध संस्कृतींच्या पाऊलखुणा जाणून घेणे, औद्योगिक क्षेत्राची ओळख करून घेणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य व संघभावना वाढवणे हा या सहलीचा मुख्य उद्देश होता. ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक अविस्मरणीय व आनंददायी अनुभव ठरल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मुख्याध्यापक महादेव कांबळे, सहल विभाग प्रमुख गिरी एम. एन.चौरे बी.ए. तसेच शिक्षिका सौ. शितल झिंगाडे  यांच्या नेतृत्वाखाली ही सहल यशस्वीपणे पार पडली. संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाशराव मालखरे, उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव, सचिव दिलीप गणेश, सहसचिव ॲड. सुग्रीव नेरे, बी.आर. सूर्यवंशी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले.

 
Top