धाराशिव (प्रतिनिधी)-  रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या.

श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय,धाराशिव येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मोटार वाहन निरीक्षक सचिन बंग व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी बहीर यांनी शालेय विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी नियम, हेल्मेट व सीट बेल्टचे महत्त्व, वेग मर्यादेचे पालन, मद्यपान करून वाहन न चालविणे तसेच विविध रस्ता चिन्हांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. रस्त्यावर अपघात झाल्यास अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा विषयक प्रश्नमंजुषा घेण्यात येऊन पारितोषिकांचे वितरण करण्यात आले आणि माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.

रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत धाराशिवसोलापूर महामार्गावरील तामलवाडी टोल नाका येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात मोटार वाहन निरीक्षक सुनील शिंदे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विशाल भगरे, सहायक पोलिस निरीक्षक गोकूळ ठाकूर, वाहतूक पोलीस कर्मचारी, चे सावंत,तामलवाडी टोलनाक्यावरील सर्व कर्मचारी व डॉक्टर उपस्थित होते. सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी परिवहन विभाग,महामार्ग पोलीस, स्थानिक पोलीस व तामलवाडी टोल नाका प्रशासनाच्या वतीने अपघातप्रवण ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट) पाहणी करण्यात आली. यावेळी सुरतगाव,वडगावकाटी, सांगवीकाटी, मुक्तीनगर, गोंधळवाडी पाटी, कदमवाडी या ‌‘डेंजर झोन‌’ ठिकाणांची पाहणी करून आवश्यक उपाययोजनांबाबत टोल नाका प्रशासनाला निर्देश देण्यात आले. तसेच मोटार वाहन निरीक्षक सुनील शिंदे यांनी सांगवी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून सभेमध्ये रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

 
Top