धाराशिव (प्रतिनिधी)- वडगाव (ता. धाराशिव) येथील राजकारणातील एक अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्व, माजी सरपंच श्री. विश्वास नाना मोरे यांनी आज आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला अनुभवी नेतृत्वामुळे पक्षाची ताकद वाढणार विश्वास नाना मोरे यांनी सरपंच पदाच्या कार्यकाळात वडगावच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यांची सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ आणि कामाची दांडगी तळमळ यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला या भागात मोठी उभारी मिळणार आहे.
यावेळी बोलताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की, “विश्वास नानांसारख्या अनुभवी आणि जनसामान्यांची जाण असलेल्या नेत्याच्या आगमनामुळे आमचा सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार अधिक मजबूत झाला आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला आणि पर्यायाने सर्वसामान्य जनतेला नक्कीच होईल.“ पक्षात प्रवेश केल्यानंतर विश्वास नाना मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विचारांवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून मी हा निर्णय घेतला आहे. वडगाव आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वजण खांद्याला खांदा लावून काम करू.“ या पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि वडगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वास नानांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात शिवसेनेची पकड अधिक घट्ट झाल्याचे बोलले जात आहे.
