धाराशिव (प्रतिनिधी)-  आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर सलगरा दिवटी (ता. तुळजापूर) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस आय आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली. या सभेच्या माध्यमातून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधत महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी काक्रंबा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. सभेला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निवडणुकीच्या रिंगणातील अधिकृत उमेदवार: श्री. ढवळे रामचंद्र दौलतराव (उमेदवार: काक्रंबा जिल्हा परिषद गट) श्री. पांडगळे उमेश रमेश (उमेदवार: काक्रंबा पंचायत समिती गण) श्री. फुलमाळी शामसुंदर दत्तात्रय (उमेदवार: सलगरा दिवटी पंचायत समिती गण)

विकासाचा शब्द आणि जनसेवेचा निर्धार सभेला संबोधित करताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्र व राज्य सरकारांच्या धोरणांवर भाष्य करत ग्रामीण विकासाची नवी दिशा मांडली. ते म्हणाले की, "शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष हा जनतेच्या विश्वासावर आधारलेला पक्ष आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला आणि तरुणांच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करणे हेच आमचे प्राथमिक ध्येय आहे. विकास, न्याय आणि लोकहितासाठी आमची लढाई सातत्याने सुरू राहील." उमेदवारांची कटिबद्धता यावेळी उपस्थित उमेदवारांनीही जनतेशी संवाद साधला. पारदर्शक कारभार, प्रामाणिक सेवा आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही उमेदवारांनी मतदारांना दिली.

या सभेसाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, निष्ठावंत शिवसैनिक आणि सलगरा दिवटी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या यशस्वीतेमुळे महाविकास आघाडीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 
Top