धाराशिव (प्रतिनिधी)- नांदेड येथे दि. 24 व 25 जानेवारी रोजी आयोजित ‌‘हिंद-दी-चादर‌’ श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350 व्या बलिदान पर्वानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी लंगर सेवेसाठी आवश्यक असलेल्या विविध वस्तू व साहित्याचा पुरवठा करणारा ट्रक धाराशिव येथून काल जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केला.या प्रसंगी जिल्हाधिकारी किरण पुजार यांनी,गुरुदेव श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या बलिदानातून मानवतेची,धर्मस्वातंत्र्याची व सामाजिक सलोख्याची प्रेरणा मिळते,असे प्रतिपादन केले.

नांदेड येथे होणाऱ्या या समारंभात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असून, त्यांच्या सेवेसाठी लंगर ही परंपरा सामाजिक एकतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. धाराशिव जिल्ह्यातील समाजबांधवांच्या सहकार्याने लंगरसाठी आवश्यक साहित्य वेळेत पोहोचावे,यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केल्याचेही त्यांनी सांगितले. या ट्रकद्वारे लंगरसाठी लागणारे धान्य, स्वयंपाक साहित्य व इतर आवश्यक वस्तू नांदेडकडे पाठविण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन,स्वयंसेवी संस्था व समाजबांधव यांचा समन्वय महत्त्वाचा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,तहसीलदार (महसूल) प्रकाश व्हटकर,नायब तहसीलदार संतोष पाटील यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत कार्यक्रमाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. नांदेड येथे होणारा हा दोन दिवसीय कार्यक्रम ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्वाचा असून,देशभरातून व राज्यातून भाविकांची उपस्थिती आहे.या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातून लंगरसाठी पाठविण्यात आलेले साहित्य हे सेवाभाव आणि सामाजिक एकात्मतेचे उत्तम उदाहरण ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 
Top