उमरगा (प्रतिनिधी)-  जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीत जिल्हा परिषदेच्या 9 जागेसाठी आलेले 90 अर्ज मंजूर झाले आहेत. तसेच पंचायत समितीच्या 18 जागेसाठी 165 अर्ज मंजूर झाले आहेत. पक्षांकडून उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांना पक्षाने उमेदवारी नाही दिली तरी अपक्ष उमेदवार म्हणून मान्यता मिळाल्याने बंडखोरांची संख्या वाढल्याने राजकीय नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहिर झाल्यापासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत. नगरपालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे) ने काँग्रेसच्या हातात हात घालून सत्ता हस्तगत केली. तर भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस (अप) सोबत युती करुनही अपेक्षित यश मिळाले नाही. ठाकरे ब्रॅण्ड म्हणून मिरवणाऱ्या शिवसेना (उबाठा) व मनसेला धोबीपछाड मिळाला. यामुळे ठाकरे सेनेने हातासोबत जुळवून घेतले. तर महायुतीच्या वाटाघाटी होऊनही कांहीं मतदारसंघावरुन घोडे आडल्याचे दिसत आहे. अंतिम वाटाघाटी न उमेदवारी अर्ज छाननीत गुरुवारी (दि.22) जिल्हा परिषदेच्या 9 जागेसाठी 90 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये भाजपाचे 6, शिवसेना (ठाकरे) चे 6, काँग्रेस 4, शिवसेना (शिंदे) 2, राष्ट्रवादी काँग्रेस (अप) 3, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) 5, बसपा 3, वंचित बहुजण आघाडीचे 2 तर 57 अपक्ष उमेदवार असे एकुण 90 उमेदवारांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तर पंचायत समितीच्या 18 जागेसाठी 165 अर्ज मंजूर झाले आहेत. अर्ज माघारी घेण्यासाठी 27 तारखेपर्यंत वेळ असुन विविध पक्षात झालेल्या बंडखोरांना थंड करण्यात किती यश येते हे पहावे लागणार आहे.


आष्टेवरील आक्षेप नामंजूर

तुरोरी जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रियंका प्रकाश आष्टे यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार पूजा विकास जाधव यांनी आक्षेप घेतला की, उमरगा नगरपालिका शहर हद्दीत प्रियंका प्रकाश आष्टे यांचे नाव समाविष्ट असून त्यांनी नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवाय त्यांनी नामनिर्देशन पत्रात प्रिया प्रकाश आष्टे, प्रियंका प्रकाश आष्टे व प्रियंका सचिन जाधव या तिन्ही नावाची व्यक्ती मीच असल्याचे शपथपत्र दाखल करुन नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी दाखल करूण माघारी घेतली होती. तसेच मतदानाच्या दिवशी त्यांनी उमरगा शहरातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला होता. या पुराव्याच्या आधारे संबंधित उमेदवार प्रियंका प्रकाश आष्टे यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. परंतु सुनावणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी सदरचा आक्षेप नामंजूर केला.


 
Top