धाराशिव (प्रतिनिधी)- समाजात शांतता व समृध्दी निर्माण होण्याकरिता ज्ञानवंतानी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन डॉ. शिवाजीराव देशमुख यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफताना जेष्ठ मराठी साहित्यिक डॉ. शिवाजीराव देशमुख बोलत होते.
डॉ. देशमुख े म्हणाले की, बापूजींच्या विचारांवर महाराष्ट्र घडत आहे पण शिक्षकांनी, प्राध्यापकांनी आणखी पुढाकार घेणे गरजेचे आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील खऱ्या अर्थाने शेवटचा दुवा म्हणजे शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे होय. त्यांचे कार्य म्हणजे महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील सुवर्णपान आहे.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. संदीप देशमुख म्हणाले की, बापूजींच्या विचारांचा महाराष्ट्रभर जागर यासाठी महत्वाचा आहे की,आपण आपला इतिहास विसरु नये, माणूस आधुनिक जगात एक वाटसरू आहे,बापूजींच्या विचारांमुळे या वाटसरुला ज्ञानाचा महामार्ग निश्चित सापडेल. सदर प्रसंगी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी तृषाली साळुंके, गट विकास अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ मदनसिंह गोलवाल, डॉ मंगेश भोसले,प्रा विवेकानंद चव्हाण, डॉ बालाजी गुंड,प्रा बबन सुर्यवंशी,प्रा सचिन चव्हाण, डॉ मारुती लोंढे, डॉ दत्तात्रय साखरे, डॉ केशव क्षीरसागर यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
