धाराशिव (प्रतिनिधी)-  अचानक उठायचं व अमुक कोटींचा भ्रष्टाचार झाला म्हणायचं पण चार वर्ष भाजपचे नेते झोपले होते का? सत्तेत असलेला भाजप आज निवडणुकीत मतदारामध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिली आहे. 

यावेळी जाधवर म्हणाले की, सत्तेत सोबत राहायचं आणि सत्ता जाऊन चार वर्षानंतर जाग यावी यातच यांचा प्रामाणिकपणा दिसतो. डिसेंबर 2021 पर्यंत आम्ही भाजप सोबत सत्तेत होतो. त्या काळातील हे भ्रष्टाचार झाल्याचे सांगत असतील तर मग हे आमच्या बरोबर का राहिले. जर असा कारभार सुरु होता तर मग सत्तेतून स्वाभिमानाने बाहेर पडायला हवं होत. तेव्हाच तक्रारी करून चौकशीची मागणी का केली नाही? उपनगराध्यक्ष कोण होत हे काय शहराला माहिती नाही का? किती बुद्धीभेद करावा हे फक्त भाजपकडून शिकावं असा चिमटा तानाजी जाधवर यांनी काढला. 

लेखापरीक्षण अहवाल दाखवला पण त्यानंतर त्याला दिलेलं प्रशासकीय उत्तर तुम्ही द्यायला विसरलात. थोडा अभ्यास कमी पडला किंवा तुमच्या नेत्यांना जुन्या भाजप वाल्याना तोंडावर पाडण्यासाठी असे केले असावे. एवढा मोठा भ्रष्टाचार वास्तवात असता तर तुम्हाला राणा पाटील यांनी पत्रकार परिषद घ्यायला लावली असती का? याचा विचार किमान भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी करायला हवा होता, असे तानाजी जाधवर यांनी म्हटले.


 
Top