उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा शहरातील आदर्श विद्यालयात प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम यावर विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता सहावी वर्गातील विद्यार्थ्यांनी प्लास्टिक पिशवीला पर्याय म्हणून कापडी पिशव्या शिवून त्याचे प्रदर्शन व विक्री शाळेत भरवले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सैपन शेख हे होते. प्रमुख उपस्थितीत पर्यवेक्षक श्रीपाद कुलकर्णी हे होते. या उपक्रमामध्ये तब्बल 65 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांनी घरामध्ये स्वतः घरातील कपड्यांच्या विविध आकाराच्या आकर्षक व मजबूत पिशव्या बनवल्या यात उत्कृष्ठ पिशवी तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले. त्यात प्रथम क्रमांक कु. ऐश्वर्या चंद्रकांत लोंढे, द्वितीय क्रमांक कु. भूमी सुनील कांबळे, तृतीय कु. लक्ष्मी किरण सुर्यवंशी तर उत्तेजनार्थ सिद्धनाथ विजय माने यांनी पारितोषिक पटकावले. 

या प्रसंगी वर्गशिक्षिका श्रीमती सुवर्णा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, प्लास्टिकचा अतिवापर हा पर्यावरण व मानवी आरोग्यासाठी अतिशय घातक आहे, प्लास्टिक मुळे होणारे प्रदूषण जमीन व पाणी नापीक करते. हे जर नदीवाटे सागरात गेले तर पाण्यातील जिव नष्ट करते. सागरातील मासे व इतर जलचर प्राणी नष्ट होतात. प्लास्टिक शरीरात गेलेल्या सजीवांना कॅन्सर व हार्मोनल असंतुलन अशा अनेक समस्या शरीरात निर्माण करतात तसेच वंधत्व, थायरॉईड आणि हृदयविकाराचा धोका संभवतो. 

प्लास्टिकचे सूक्ष्म कण पाण्यात मिसळून ते पाणी व अन्नद्वारे शरीरात प्रवेश करतात. जे रक्तात मिसळल्यानंतर आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी करतात. प्लास्टिक जाळल्याने डायोक्सिन सारखे विषारी वायू निर्माण होऊन ते हवेत पसरतात आणि आपल्याला श्वसणाचे आजार जडतात. प्लास्टिकचा वापर कमीत कमी करून पुनर्वापर करणे हाच यावर उत्तम उपाय आहे. 

आपल्या परिसरात पाहिले असता जिकडे तिकडे प्लास्टिकच्या पिशव्या, चमचे, द्रोण, पत्रावळ्या, कप, खराब झालेले चप्पल आणि अशा अनेक वस्तू पडलेल्या दिसतील. हे प्लास्टिक गोळा केले जाते आणि जाळले जाते किंवा तो वातावरणातील हवेनी इकडे तिकडे पसरून जमिनीत, पाण्यात मिसळते या प्लास्टिकमुळे येणाऱ्या पिढीला आरोग्याविषयी अनेक समस्या निर्माण होतील म्हणून वेळीच आपण सर्वांनी सावध व्हावे, बालपणातच आपणास प्लास्टिकचे दुष्परिणाम समजून घेऊन आपल्यात  जागृती व्हावी आपण दैनंदिन वापरात प्लास्टिक पिशव्यांचा अधिकाधिक वापर करतो या पिशव्या थोड्याही फाटल्या तर त्या आपण फेकून देतो म्हणून आपण मजबूत व टिकाऊ तसेच आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित अशा कापडी पिशव्या वापरू या आपण आज प्रतिज्ञा करू आपल्या पालकांनाही आपण सांगूया की प्रत्येकाने बाजारात जाताना खिशात एक छोटी कापडी पिशवी घेऊन जा, ज्यामुळे बाजारात गेल्यावर पटकन ती वापरता येईल अशा प्रकारे विद्यार्थ्यांची प्रबोधन केले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य शेख यांनी प्लास्टिक हे कसे मानवाच्या आरोग्यास व येणाऱ्या पिढीस धोकादायक आहे. हे विद्यार्थ्यांना सांगून आपण स्वतः प्लास्टिक वापरू नये व दुसऱ्यांनाही त्यापासून परावर्त करावे असे आवाहन केले. या उपक्रमासाठी तात्याराव फडताळे, दयानंद उमाटे, सुरेश शेंडगे यांनी पुढाकार घेतला. यावेळी शाळेतील विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top