धाराशिव (प्रतिनिधी)-  नुकताच येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ची भेट घेऊन अंतराळ तंत्रज्ञान, उपग्रह, रॉकेट प्रक्षेपण, पृथ्वी निरीक्षण, दळणवळण, हवामान अंदाज, नौदिग्दर्शन व आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांतील  महत्त्वपूर्ण  माहिती मिळवली. तसेच 'चंद्रयान-3' प्रकल्पातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन प्राप्त केले.

त्याचबरोबर, बंगळुरू येथील 'क्वॉडजेन वायरलेस सोल्यूशन्स प्रा. लि.' व 'बीडीएम @ सिम टू सिलिकॉन इनोव्हेशन्स प्रा. लि.' या कंपन्यांमध्ये औद्योगिक भेटीद्वारे वायरलेस संप्रेषण आणि व्हीएलएसआय डिझाइन या विषयांवर महत्त्वाचे ज्ञानार्जन केले. या सर्व उपक्रमांसाठी माजी विद्यार्थी श्रीकांत बोमा व सागर कोरे यांचे सहकार्य प्राप्त झाले. या यशस्वी औद्योगिक भेटीसाठी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, विभागप्रमुख डॉ. प्रशांत कोल्हे, भेट व्यवस्थापन समन्वयक प्रा. दर्शन ठाकूर व प्रा. नयना भोसले तसेच विद्यार्थी प्रतिनिधी भूमिका इंगळे व राजवर्धन औरादे यांचे मार्गदर्शन व प्रयत्न उल्लेखनीय आहेत.

प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी या औद्योगिक भेटीचा संदर्भ स्पष्ट करताना म्हटले की, महाविद्यालयाची धारणा विद्यार्थ्यांना अद्ययावत तांत्रिक ज्ञानासोबतच उद्योग-अनुभव देण्याची आहे. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठीचे हे आयोजन त्याचाच एक भाग होते. या भेटीचे एक महत्त्वाचे पैलू म्हणजे इस्रोमध्ये कार्यरत असलेल्या या महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे यश, जे सदैव प्रेरणादायी असते. अशा भेटींद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्राची ओळख करून देणे व त्यांना भविष्यासाठी प्रेरित करणे हा मुख्य हेतू राहिला. या  औद्योगिक भेटीनंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून पालकांनीही या भेटीबाबत महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले आहेत.

 
Top