धाराशिव (प्रतिनिधी)- 0 ते 6 वर्षे वयोगटातील अनाथ बालकांच्या संगोपन, संरक्षण व पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या ‘सह्याद्री अंकुर शिशुगृह', धाराशिव (विशेष दत्तक संस्था) येथे दत्तक विधान प्रक्रियेअंतर्गत आणखी एका निरागस बालकाच्या जीवनाला सुरक्षित भविष्याची दिशा मिळाली. शासनाच्या कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांनुसार तसेच महिला व बाल विकास विभाग आणि जिल्हा बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनानुसार 13 महिन्यांच्या अनाथ बालकास प्रेमळ पालक व हक्काचे घर मिळवून देण्यात आले. यानिमित्ताने संस्थेतील सहावे दत्तक विधान विधिवतपणे संपन्न झाले.
संस्थेच्या सभागृहात आयोजित दत्तक विधान समारंभ अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. नवीन घराच्या उंबरठ्यावर प्रवेश करणाऱ्या चिमुकल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपस्थित मान्यवरांच्या मनात समाधान, आनंद व आशेची भावना दाटून आली होती. या समारंभास शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. विना पाटील ,रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक धाराशिवचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. एस. एम. देशमुख, संस्थेचे सचिव प्रा. डॉ. रमेश दापके, रुपामाता उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक अँड. अजित गुंड, बालरोगतज्ज्ञ डॉ. एम. टी.सूर्यवंशी,डॉ. सचिन रामढवे, डॉ. दिग्गज दापके-देशमुख, महिला बाल विकास विभागातील विभावरी खुणे, जयश्री पाटील, अंकुर शिशुगृहाचे गणेश वाघमारे, किरण बहीर यांच्यासह सर्व पदाधिकारी, कर्मचारी व काळजीवाहक उपस्थित होते.
समाज सहभागासाठी संस्थेचे आवाहन
अनाथ बालकांना केवळ निवारा नव्हे, तर प्रेम, आपुलकी व सुरक्षित भवितव्य देणारे दत्तक विधानाचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. नागरिकांनी आपल्या वाढदिवस, सण-उत्सव व अन्य कौटुंबिक आनंदाच्या प्रसंगी संस्थेस भेट देऊन बालकांसोबत सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अशा संवेदनशील सहभागातून बालकांच्या जीवनात आनंद निर्माण होण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होण्यास मदत होईल.
