धाराशिव (प्रतिनिधी)- श्री काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान, आसू ता. फलटण जिल्हा सातारा व स्वदेशी भारत बचत गट सकुंडे मळा यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या कार्यक्रमात पंडित कांबळे यांनी संपादित केलेल्या “खुटकंदील योगीराज वाघमारे यांच्या अभ्यासक्रमीय कथा“ या कथासंपादनास स्वदेशी भारत साहित्य सन्मान पुरस्कार 2025 हा प्रदान करण्यात आला. श्री काळेश्वर मंदिर आसू येथे हुतात्मा राजू भाई दीक्षित यांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त 'स्वदेशी दिनी' म्हणजेच 30 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या स्वदेशी भारत राज्यस्तरीय साहित्य संमेलनात महानुभाव पंथाचे नरेंद्र शास्त्री यांच्या हस्ते व फलटणचे जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, अभ्यासक्रमातील कवी हनुमंत चांदगुडे, जीवन इंगळे व कार्यक्रमाचे संयोजक प्रकाश सकुंडे गुरुजी यांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, वृक्षाची रोप व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
पंडित कांबळे यांचे यापूर्वी “संदर्भ“, “चरथ भिक्खवे“, “पेटलेल्या शहराच्या कल्लोळात“, हे कविता संग्रह, नाचा रे नाचा, गाणी माझ्या गावची, विहार गाणी हे बालकविता संग्रह प्रकाशित आहेत. साहित्यिक प्रवृत्ती : मूल्ये आणि जाणीव हे योगीराज वाघमारे यांच्या प्रस्तावनाचे संपादन. उजेडाचा वारस: यु.डी. गायकवाड गौरव ग्रंथ, उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबेडकरवादी साहित्यिक, दतांकुर यांच्या निवडक कविता, खुटकंदील योगीराज वाघमारे यांच्या अभ्यासक्रमीय कथा ही संपादित पुस्तके प्रकाशित आहेत. तर डॉक्टर बाबुराव गायकवाड यांचे साहित्य आशय आणि विश्लेषण हे समीक्षेची पुस्तक प्रकाशित आहे. पंडित कांबळे यांच्या अनेक कविता व लेख संपादित पुस्तकात प्रकाशित आहेत. काही कवितांचा हिंदी अनुवादही प्रकाशित झालेला आहे. त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
पंडित कांबळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल वंदना साळुंखे, अपर्णा कुचेकर, सुषमा वाकडे, सुप्रिया नरवडे, बालाजी कानडे, सुरेश गायकवाड, वर्षा जाधवर, जयंती इंदापूरकर, श्रीकांत माळोदे,अतुल कनोजवार,रत्नमाला मस्के, अरविंद जाधव, स्वाती माने, दिपाली खारे, प्रेमलता जांभळे,पिरजादे मॅडम यांनी व सर्व शिक्षक सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
