धाराशिव (प्रतिनिधी)-  नगर परिषदांसाठीआचारसंहिता लागू झाल्यापासून म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकउून धडक मोहिम राबवली जात आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत विविध ठिकाणी छापे टाकून 222 गुन्हे दाखल केले आहेत. 223 आरोपींना अटकही केली. शिवाय कारवाईत 57 लाख 36 हजार 675 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मोहिमेत 13 वाहने जप्त करण्यात आली आहेत.

निवडणुकीसाठी लागू केलेल्या आचारसंहितेच्या वेळीही हॉटेल्स आणि धाब्यांवरही सर्रास मद्यविक्री सुरू होती. पथकाने तपासणी मोहिमेत 46 गुन्हे नोंदवून 56 आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये एका वाहनासह 9 लाख 04 हजार 855 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाने कारवाई करून 10 गुन्हे नोंदवले आहेत. 8 आरोपींना अटक करून 3 लाख 71 हजार 300 रूपये किंमतीची 8 हजार 340 लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय उपआयुक्त व धाराशिव उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करून 10 गुन्हे दाखल करून 10 आरोपीस अटक केली आहे. 34 हजार 25 रूपयांची अवैध दारू पकडली आहे. 


 
Top