धाराशिव (प्रतिनिधी)-  अत्यंत देखण्या अशा राज्यातील तालुकास्तरावरील न्यायालयाच्या इमारतीचे तुळजापूर येथे उद्घाटन होत आहे,ही आनंदाची बाब आहे. नुकतेच आपण संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले. संविधानाच्या तत्वाचे पालन या इमारतीतून करताना न्यायापासून वंचित असलेल्यांना न्याय देण्याचे काम करावे. असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी केले.

20 डिसेंबर रोजी तुळजापूर येथे नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन न्यायमूर्ती वराळे यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात न्यायमूर्ती वराळे बोलत होते. अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती विभा कंकणवाडी, पालक न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे, न्यायमूर्ती किशोर संत, न्यायमूर्ती अरुण पेडणेकर, न्यायमूर्ती वाय.जी.खोब्रागडे, न्यायमूर्ती आर.एम.जोशी, न्यायमूर्ती मेहरोज अशरफ खान पठाण, न्यायमूर्ती वैशाली जाधव पाटील, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

न्यायमूर्ती वराळे म्हणाले की,समता,न्याय व बंधुता या तत्वावर भारताचे संविधान काम करते.जातीप्रथेमुळे भेदाभेद निर्माण होतो. भेदाच्या ह्या भिंती गळाल्या पाहिजे. त्यासाठी बंधुता आली पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार दिला आहे, तो अत्यंत महत्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे आराध्य दैवत आहे. जाणता राजा म्हणून त्यांची ओळख आहे.ते उत्तम प्रशासक होते. जगाच्या पाठीवर ग्रेट राजे हे शिवाजी महाराज होते. त्यांना रयतेची काळजी होती.असे त्यांनी सांगितले. 

स्वागतपर भाषणातून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांनी न्यायालयाच्या नूतन इमारतीत उपलब्ध सोयीसुविधांची माहिती दिली. प्रारंभी न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी कोनशिला व फित कापून नूतन इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी मान्यवरांनी इमारतीतील विविध दालनाची पाहणी केली व विधिज्ञ मंडळाच्या दालनाचे उद्घाटन केले. मान्यवरांच्या हस्ते मंचावरील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार राणाजगजितसिंह पाटील,महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य वसंतराव साळुंके, मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक स्वप्निल खटी, मुंबई उच्च न्यायालयाने निवृत्त न्या. के. एल. वड्डे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तुळजापूर विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.दत्तात्रय घोडके यांनी प्रस्ताविक केले.


देखणी वास्तू आणि मातेशी नाळ

न्यायमूर्ती चंद्रशेखर म्हणाले की, तुळजापूर न्यायालयाच्या नूतन इमारतीचे आनंदाचा क्षण आहे. अत्यंत देखणी अशी ही वास्तू तयार झाली आहे. असे त्यांनी सांगितले.  तर न्यायमूर्ती ब्रम्हे म्हणाले की, मराठवाड्याच्या अडीअडचणीची जाण असलेल्या व इथल्या मातीशी नाळ जुळलेल्या मान्यवरांच्या मार्गदर्शनातून ही देखणी व सर्व सुविधायुक्त अशी वास्तू उभी राहिली आहे. या इमारतीचे पावित्र्य टिकविणे हे इथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे, पक्षकारांचे, नागरिकांचे व अधिकाऱ्यांचे काम आहे. 


यांचा झाला सत्कार

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एन.व्हि.भंडे, कार्यकारी अभियंता एस.जी.केत, सी.व्ही.चाकोते, उपविभागीय अभियंता व्हि.वाय.आवळे, सहायक अभियंता डी.डी.जंजाळ, कनिष्ठ अभियंता ओ.के.कुलकर्णी, न्यायालयीन इमारतीचे बांधकाम कंत्राटदार डी.एस.हरकुळे व विद्युत कंत्राटदार संतोष कुलकर्णी यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

 
Top