भूम (प्रतिनिधी)- भूम नगर पालिकेच्या निवडणुकीत यंदा मतदारांनी अत्यंत अनपेक्षित आणि वेगळा निकाल देत नवा इतिहास घडवला आहे. नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत आलमप्रभु शहर विकास आघाडीच्या उमेदवार संयोगीता गाढवे यांनी जनशक्ती आघाडीच्या सत्वशिला थोरात यांचा 198 मतांनी पराभव करत विजय मिळवला. मात्र, नगरसेवक पदाच्या निकालात जनशक्ती आघाडीने बाजी मारली असून त्यांचे 14 उमेदवार विजयी झाले आहेत, तर आलमप्रभु आघाडीला केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण तीन फेऱ्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडली. पहिल्या फेरीपासूनच गाढवे आणि थोरात यांच्यात चुरंशीची लढत पाहायला मिळाली. पहिली फेरी: संयोगीता गाढवे यांना 2043, तर सत्वशिला थोरात यांना 1894 मते मिळाली. दुसरी फेरी: गाढवे यांना 2552, तर थोरात यांना 2345 मते मिळाली. तिसरी फेरी: या फेरीत थोरात यांनी 2649 मते घेत मुसंडी मारली, मात्र एकूण मताधिक्यात गाढवे यांनी आघाडी टिकवून ठेवली.
अंतिम निकाल: संयोगीता गाढवे यांना एकूण 7,086 मते मिळाली, तर सत्वशिला थोरात यांना 6,888 मते पडली. अपक्ष उमेदवार प्रगती गाढवे यांनी 246 मते घेतली.
नगरसेवक पदात 'जनशक्ती'ची लाट
नगराध्यक्षपद हातातून निसटले असले तरी, शहराच्या प्रभागांमध्ये जनशक्ती आघाडीने वर्चस्व गाजवले आहे. 20 पैकी 14 जागा जिंकून जनशक्तीने पालिकेतील बहुमत आपल्याकडे खेचून आणले आहे.
जनशक्तीचे विजयी शिलेदार: चंद्रमणी गायकवाड, रामराजे कुंभार, अनिल शेंडगे, रुपेश शेंडगे, नवनाथ रोकडे, आबासाहेब मस्कर, विठ्ठल बागडे, सुनिता वीर, मुजावर शमशाद, सुरेखा काळे, मनियार नुरजहाँ, शितल गाडे, चंद्रकला पवार, लक्ष्मी साठे.
आलमप्रभु आघाडीचे विजयी उमेदवार: रिना शिंदे, सुरज गाढवे, भाग्यश्री माने, अभिजीत शेटे, तोफिक कुरेशी, मंगल नाईकवाडी.
इतिहास बदलला: निकालाने राजकीय समीकरणे फिरली
भूमचा आजवरचा इतिहास पाहता मतदार एकाच बाजूने स्पष्ट कौल देतात. मात्र, यंदा मतदारांनी नगराध्यक्ष एका गटाचा आणि नगरसेवक दुसऱ्या गटाचे निवडून देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या निकालामुळे पालिकेत काम करताना नगराध्यक्षांना बहुमतासाठी जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांवर अवलंबून राहावे लागणार आहे. निकालांनंतर संजय गाढवे गटाच्या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष विजयाचा जल्लोष केला. तर जनशक्ती आघाडीने 14 नगरसेवक निवडून आल्याबद्दल शहरात गुलालाची उधळण करत विजय साजरा केला.

