तुळजापूर  (प्रतिनिधी)- मंगळवारी तुळजापूर शहरात झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण माहिती विशद केली. यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव कोतवळ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, अमर मगर या नेत्यांनी सांगितले की, या घटनेवरून तीर्थक्षेत्र तुळजापूरची बदनामी नेमकी कोण करत आहे, हे स्पष्ट झाले आहे.

मंगळवारी घडलेल्या महाविकास व भाजपमधील भांडणा संदर्भात महाविकास आघाडीच्यावतीने बुधवार दि. 17 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ड्रग्स, रिव्हॉल्व्हर बाळगणे, घरावर जाऊन सशस्त्र हल्ले करणे अशी संस्कृती तुळजापूरसारख्या पवित्र तीर्थक्षेत्रात यापूर्वी कधीच नव्हती. पूर्वी थोडा जरी वाद झाला तरी येथील ज्येष्ठ नेते तात्काळ एकत्र येऊन तो मिटवत असत. मात्र सध्याचे विद्यमान आमदार अद्याप तुळजापूरला भेट देण्यासाठी आलेले नाहीत, ही गंभीर बाब असल्याचे नेत्यांनी नमूद केले.

महाविकास आघाडीचे आमदार कैलास पाटील यांनी मात्र घटनास्थळी भेट देऊन शांतता प्रस्थापित करण्याचे काम केले, याची दखल घेण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी जातीने लक्ष घालून दोषींना तात्काळ जेलमध्ये पाठवले, तरच तुळजापुरात शांतता नांदेल, असे मत व्यक्त करण्यात आले. तीर्थक्षेत्र तुळजापुरात सध्या  गुंडगिरी दहशत वाढले असून यामुळे भाविक, व्यापारी भयभीत झाले आहेत. परिस्थिती अशीच राहिली तर तीर्थक्षेत्र तुळजापूरचे महात्म्य कमी होणार आहे. याचा फटका व्यापारी, पुजारी, शहरवसियांना  भोगाव लागणार आहे. त्यामुळे वेळीच गुंडागर्दी दहशत कमी होण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता येथे जातीने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. 


पोलिसांची भूमिका संशयास्पद

पत्रकार परिषदेत पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त करण्यात आला. पोलिस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने ही घटना पोलिसांच्या संगनमतातून तर घडली नाही ना, असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख यांच्या भूमिकेबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करत विविध आरोप केले. या घटनेचा मास्टरमाइंडला तात्काळ अटक करा, हल्ल्याची सीसीटीव्ही फुटेज व सीडीआर तपासणी करून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. 


आचारसंहिता असताना पिस्तूल कशी काय?

आचारसंहिता काळात शस्त्र परवाने जमा केले जात असताना मंगळवारी रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या कशा झाडल्या गेल्या, याचाही खुलासा करण्याची मागणी करण्यात आली. तुळजापुरात गावठी कट्टे बाळगणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, असेही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठणकावून सांगितले. सदरील घटना संभाव्य पराभवाच्या भीतीतून एका उमेदवाराने घडवून आणल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकरणी कुलदीप मगर यांनी फिर्याद दिली असून, उमेदवाराच्या घरावर हल्ला झाल्याने स्वतंत्र फिर्याद दाखल केली जाणार आहे. हल्ल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी स्पष्टपणे कोयते घेऊन येताना दिसत असल्याचा दावाही करण्यात आला. जर पोलिसांनी सत्ताधाऱ्यांशी संगनमत करून गुन्हे दाखल केले नाहीत, तर महाविकास आघाडी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. तसेच यापुढे जशास तसे उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत, असा इशाराही नेत्यांनी दिला.

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव कुतवळ, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज कदम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे धैर्यशील पाटील नांदुरीकर, शिवसेनेचे सुधीर कदम, भाऊ भांजे व भारत कदम यांनी संबोधित केले आहे. धाराशिव शहरात देखील महाविकास आघाडीच्यातवतीने सोमनाथ गुरव, प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे, सरफराज काझी यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूरच्या गुंडगिरीचा निषेध व्यक्त करून पोलिस अधीक्षक यांना निवेदन देवून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

 
Top