धाराशिव (प्रतिनिधी)-  तुळजापूर येथे उभारण्यात आलेल्या नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन शनिवार,दि.20 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.15 वाजता संपन्न होणार आहे.या नूतन इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री.चंद्रशेखर हे असतील.

या उद्घाटन समारंभास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सर्वश्री रविंद्र घुगे,न्यायमूर्ती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री देव यांचीही प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. हा उद्घाटन सोहळा तुळजापूर न्यायालयाच्या नवीन इमारतीत आयोजित करण्यात आला असून या नूतन इमारतीमुळे न्यायालयीन कामकाज अधिक सुलभ,गतिमान व नागरिकांसाठी सोयीचे होणार आहे. न्यायप्रक्रियेला भौतिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या इमारतीमुळे तुळजापूर व परिसरातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. या समारंभासाठी तुळजापूरच्या दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), स्वाती अवसेकर आणि विधीज्ञ मंडळ,तुळजापूरचे अध्यक्ष अँड.दत्तात्रय घोडके हे निमंत्रक असून या उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


 
Top