धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हयातील उत्कृष्ट क्रीडा खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे,या उद्देशाने शासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो.या वर्षी जिल्ह्यातून पुढीलप्रमाणे चार पुरस्कार देण्यात येणार आहेत १) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (०१),

२) गुणवंत खेळाडू – (महिला ०१, पुरुष ०१ व दिव्यांग खेळाडू ०१).या पुरस्काराचा समावेश आहे.

या पुरस्कारासाठी दिनांक ०१ जुलै ते ३० जून या कालावधीतील मागील पाच वर्षांची कामगिरी विचारात घेतली जाणार आहे. जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे त्या जिल्ह्यात किमान १५ वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे. तसेच क्रीडा मार्गदर्शकाने सतत दहा वर्ष महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शन केलेले असावे आणि त्यांचे वय ३५ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपूर्व पाच वर्षांपैकी किमान दोन वर्षे जिल्ह्याच्या मान्यता प्राप्त क्रीडा प्रकारातील अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व केलेले असावे.

क्रीडा मार्गदर्शकांसाठी गेल्या दहा वर्षांत वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते,तसेच कनिष्ठ,शालेय, ग्रामीण आणि महिला (खेलो इंडिया) राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते खेळाडू घडविलेले असणे आवश्यक आहे.सांघिक अथवा वैयक्तिक मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारातील नॅशनल गेम्स,वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेला खेळाडू किंवा राज्य/जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळवणारे किमान तीन खेळाडू तयार केलेल्या मार्गदर्शकांकडून विहित नमुन्यातील अर्ज संघटनेमार्फत अथवा वैयक्तिकरीत्या नियत मुदतीत सादर करण्याची आवश्यकता आहे.

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धाराशिव येथे संपर्क साधावा.विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्तावासह अर्ज २६ डिसेंबर २०२५ पर्यंत श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, धाराशिव येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.

 
Top