मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील समाजकारण- राजकारणातील निस्पृहतेचा आदर्श काळाच्या पडद्याआड गेल्याची शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवक पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात,'सुराणा यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेचा वसा जपला. त्यांनी राजकीय क्षेत्रातही आदर्शवाद जोपासला. शेती, शेतकरी यांच्यासह पर्यावरण रक्षण, जलसंधारण यांच्यासाठी ते अखेरपर्यंत व्रतस्थपणे कार्यरत राहीले. नळदुर्ग येथील 'आपलं घर' बालगृह व शाळेच्या माध्यमातून त्यांनी शेकडो अनाथ मुलांच्या आयुष्यात नवसंजीवनी आणली. त्यांची निस्पृह आणि आदर्श अशी जीवनशैली समाजकारण - राजकारणातील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. ज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा यांचे निधन महाराष्ट्राच्या समाजकारण राजकारण क्षेत्राची हानी आहे, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सुराणा यांचे कुटुंबीय तसेच कार्यकर्ते यांच्याप्रती संवेदना व्यक्त केली आहे. आपण या सर्वांच्या दुःखात सहभागी असल्याचे नमूद केले आहे.