कळंब (प्रतिनिधी)- नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. रांजणी या कारखान्याचे कार्यक्षेत्रामध्ये ऊस पिकासाठी कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करणेसाठी पहिल्या हवामान केंद्राची उभारणी करणारा पहिला कारखाना असल्याचे प्रतिपादन नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबर यांनी केले.
या हवामान केंद्राचा शुभारंभ जिल्हा कृषि अधिकारी राजकुमार मोरे, यांचे शुभ हस्ते व बी. बी. ठोंबरे, संस्थापक अध्यक्ष नॅचरल उद्योग समुह यांचे अध्यक्षतेखाली आणि तालुका कृषि अधिकारी सरडे यांचे उपस्थितीत दि. 9 डिसेंबर 2025 रोजी पार पडला. यावेळी बोलताना कृषिरत्न ठोंबरे म्हणाले, शेतक-यांचे ऊस पिक उत्पादन वाढविणेसाठी ॲग्रीकल्चर ट्रस्ट बारामती, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन पुणे यांचे सयुक्त विद्यमाने ऊस पिकासाठी कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आम्ही एकूण 700 शेतक-यांची निवड केली असून त्याची नोंदणी पुर्ण झाली आहे. त्यामधील पहिल्या हवामान केंद्राचा शुभारंभ आज झालेला आहे. या हवामान केंद्राद्वारे जमिनीतील आद्रता, पिकाला पाण्याची गरज, हवामानाचा अंदाज, पिकाला खताची गरज व कीड व्यवस्थापन इत्यादिची माहिती मराठी भाषेमध्ये आपल्या मोबाईलवर मिळणार आहे. अशा एकूण 26 हवामान केंद्राची उभारणी केली जाणार आहे. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन व प्रास्तावीक कारखान्याचे संचालक कृषिभूषण पांडूरंग आवाड यांनी केले. तर अशोक गुजर ऊस विकास व्यवस्थापक यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास कारखान्याचे संचालक, प्रवर्तक, शेतकरी सभासद, कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
.jpg)