धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना होऊन जनतेमध्ये क्रीडाविषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने शासनामार्फत दरवर्षीप्रमाणे जिल्हास्तरावर क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 12 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीत जिल्ह्यात क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
12 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन होणार आहे.त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे स्केटिंग व कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे कराटे स्पर्धा तसेच सायंकाळी 5 वाजता गांधी विद्यालय, चिखली,ता.जि.धाराशिव येथे कबड्डी स्पर्धा होणार आहे.14 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
15 डिसेंबर रोजी सकाळी 9.00 वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे 100 मीटर,200 मीटर धावणे व चालणे स्पर्धा तसेच सकाळी 10 वाजता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे आर्चरी स्पर्धा होणार आहे.16 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता तालुका क्रीडा संकुल,कळंब येथे आट्या-पाट्या स्पर्धा तर सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 17 डिसेंबर रोजी श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे सकाळी 9 वाजता तलवारबाजी स्पर्धा तसेच सायंकाळी 5 वाजता जिम्नॅस्टिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.18 डिसेंबर रोजी क्रीडा सप्ताहाचा समारोप सायंकाळी 5 वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे होणार आहे.
या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,धाराशिव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.तसेच जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.