धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदवी परिवार महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिवाळी मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्वोच्च आणि ऐतिहासिक साल्हेर किल्ला पायी सर करण्याचा पराक्रम खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
सह्याद्रीच्या अवघड कडेकपाऱ्यांतून, दगडधोंड्यांच्या वाटांवरून चालताना शरीरासोबत मनाचीही कसोटी लागते. मात्र व्यायामाची विशेष आवड आणि कणखर शारीरिक तयारीमुळे ओमराजे यांनी हा कठीण ट्रेक लीलया पूर्ण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साल्हेर गडावर उभे राहिल्यावर मन अभिमानाने भरून आले आणि स्वराज्याची जाणीव अधिक तीव्र झाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शारीरिक थकवा जाणवत असला तरी मन मात्र इतिहास, पराक्रम आणि स्वराज्याच्या विचारांनी उंच आकाशाला गवसणी घालत होते, असेही त्यांनी सांगितले.
या ऐतिहासिक मोहिमेला आणखी विशेष अर्थ प्राप्त झाला, जेव्हा प्रसिद्ध शिवव्याख्याते व शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांच्या शुभहस्ते खासदार ओमराजे निंबाळकर यांना “सह्याद्री भूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून शिवविचार, सह्याद्री आणि इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताचा असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. हा पुरस्कार आपल्यावर अधिक जबाबदारी टाकणारा असून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प अधिक दृढ करणारा आहे. असेही त्यांनी नमूद केले. साल्हेर किल्ला केवळ उंचीमुळे नव्हे, तर शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या इतिहासामुळे सह्याद्रीचे सर्वोच्च शिखर मानला जातो. अशा ऐतिहासिक स्थळावरून मिळालेली प्रेरणा आगामी काळातील सामाजिक व राजकीय वाटचालीत नक्कीच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास ओमराजे यांनी व्यक्त केला.
